विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:30 IST2025-03-20T08:29:50+5:302025-03-20T08:30:45+5:30
आपला उमेदवार निवडून यावा ही सर्वांची इच्छा

विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे आहेत. या काळात अनेक घडामोडी घडतील. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा, आपल्यालाच बहुमत मिळावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आताच राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणू, याबाबत विचारले असता आरोलकर यांनी वरील मत व्यक्त केले. तसेच ते म्हणाले की, आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. शेवटी आमच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदारच घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण सध्या मगो पक्षात आहे. भाजप व मगोची युती आहे. सरकार विकासकामांबाबत चांगले काम करीत आहे. मांद्रेत सुद्धा पर्यटनाशी संबंधित तसेच स्थानिकांसाठी सरकार कामे करीत आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन वर्षे आहेत. राजकारण हे नेहमीच अस्थिर असते. त्यामुळे आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही आरोलकर यांनी सांगितले.
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात किमान सहा महिन्यांतून एकदा तरी जावे. लोकांना भेटावे, त्यांची मते जाणून घ्यावीत, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे मत आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
निर्णय कार्यकर्त्यांच्या हाती
मांद्रेतील कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन तसेच सल्ल्यानुसारच पुढे जात आहोत. त्यामुळे शेवटी कार्यकर्तेच काय ते ठरवतील. सरकार चांगले काम करीत आहे. मतदारच मतदान करतात, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.