लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील बाराही तालुक्यांमधील तब्बल १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एआय संचालित करिअर मार्गदर्शन, मानसोपचार चाचणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. ''गोवा करिअर नेव्हिगेटर २०२५'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ मिळणार असून या उपक्रमाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.
शुक्रवारी कला अकादमी संकुलात झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, तंत्र शिक्षण संचालक विवेक कामत तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित आहे. करिअर 'उडान' अंतर्गत उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी एक करिअर जागरूकता मोहीम राबवण्यात येणार आहे. करिअर हँडबुक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी व्यापक मार्गदर्शक ठरेल. याशिवाय करिअर अॅम्बेसिडर क्लब प्रत्येक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करेल.
उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, हा उपक्रम स्किल इंडिया, युवा शक्ती आणि विकसित गोवा @२०३७ च्या दृष्टिकोनाप्रती सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. एक आकांक्षापूर्ण, कुशल आणि आत्मविश्वासू पिढी तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
'त्या' शिक्षकांची मला कीव येते : सावंत
बारावीची परीक्षा दिल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी 'जेईई' व वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक 'नीट' परीक्षा द्यावी लागते, हे माहिती नाही. खरे तर हे शिक्षकांचे अपयश आहे. शिक्षक त्यांना याबद्दल काहीच सांगत नाहीत. मला अशा शिक्षकांची कीव येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करिअरबद्दल योग्य मार्गदर्शन करायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारी कामात येणार 'एआय'
राज्य सरकारने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगल एलएलसीकडे प्रशासकीय कामात जायचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यासाठी करार केला असून यामुळे प्रशासकीय सेवा आता अधिक जलद व समावेशक बनणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या झाल्या. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल गोवा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.