'वंदे मातरम्'ला १५० वर्षे; आज कार्यक्रम: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:34 IST2025-11-07T07:33:32+5:302025-11-07T07:34:27+5:30
पणजीसह राज्यभरात सामूहिक गायन

'वंदे मातरम्'ला १५० वर्षे; आज कार्यक्रम: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'वंदे मातरम्' १५० वर्षे पूर्ण करत असल्याने देशभरासह गोव्यातही भाजपकडून शुक्रवारी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व सर्वानंद भगत उपस्थित
होते.
दामू नाईक म्हणाले की, शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोव्यात सर्व भाजप कार्यालयांमध्ये एकाचवेळी सामूहिक पद्धतीने 'वंदे मातरम्' गायले जाईल. हा देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे. हा कार्यक्रम नवीन पिढ्यांना एकत्र आणण्यासाठी तसेच प्रेरणा देण्यासाठी आहे.
पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर तसेच म्हापसा व मडगाव येथे पक्ष कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता वंदे मातरम् गायले जाईल. म्हापशात गोविंद पर्वतकर हे या गीताविषयी इतिहास सांगतील तर मडगाव येथे एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर हे मार्गदर्शन करतील. पक्षाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाव्यतिरिक्त राज्यात ठीकठिकाणीही असेच कार्यक्रम होतील. त्याशिवाय शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्येही 'वंदे मातरम्' गायले जाईल.
झेडपीबाबत चर्चा
काल भाजपने मतदार विशेष सधन सुधारणांवर कार्यकर्त्यांसाठी घेतलेल्या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दामू नाईक यांनी दिली, ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी झेडपी निवडणुकीबाबतही चर्चा झाली. भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे, त्याबद्दल विचारले असता, दामू नाईक म्हणाले की 'सर्वांचाच भाजप तिकिटासाठी आग्रह आहे यावरून भाजपला मोठी मागणी आहे, इतर पक्षांवर विश्वास नाही.'
वाढत्या गुन्ह्यांसाठी काँग्रेस जबाबदार : दामू नाईक
दामू नाईक यानी वाढत्या गुन्हेगारीच्या बाबतीत काँग्रेसला जबाबदार धरले. ते म्हणाले की, 'गेल्या ६० वर्षात काँग्रेसने जे पेरले त्याची वाईट फळे आम्ही आज भोगतोय. भाजपची सत्ता केवळ २०१२ पासूनच आहे. सध्या जे काही घडतेय ते या दहा वर्षांच्या सत्तेचा परिणाम नाहीय तर काँग्रेसने जे पूर्वी पेरले त्याचा परिणाम आहे.