१४ कोटींचे पर्यटन प्रकल्प रद्द; केंद्रास निधी परत

By Admin | Updated: January 18, 2015 01:41 IST2015-01-18T01:37:21+5:302015-01-18T01:41:19+5:30

पणजी : गोव्याला पाच वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी दिलेला निधी पूर्वीच्या (म्हणजे काँग्रेस) सरकारने वापरलाच नाही. उलट हा निधी अन्यत्र वळवला.

14 crore tourism projects canceled; Center funds back | १४ कोटींचे पर्यटन प्रकल्प रद्द; केंद्रास निधी परत

१४ कोटींचे पर्यटन प्रकल्प रद्द; केंद्रास निधी परत

पणजी : गोव्याला पाच वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी दिलेला निधी पूर्वीच्या (म्हणजे काँग्रेस) सरकारने वापरलाच नाही. उलट हा निधी अन्यत्र वळवला. आता जे प्रकल्प राबविणे शक्य नाही असे चौदा कोटींचे तीन प्रकल्प आम्ही रद्द करून त्यासाठीचा निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयास परत पाठवणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मडगाव येथे मिनी कन्व्हेंशन सेंटरसाठी सहा कोटी रुपयांचा निधी आला होता. चिंबल येथे ‘गोवा हट’ प्रकल्पासाठी चार कोटींचा निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिला होता. पणजीत ‘स्काय वॉक’ प्रकल्पासाठी आणखी चार कोटी रुपये मंजूर होऊन आले होते. या प्रकल्पांसाठीचा निधी पूर्वीच्या सरकारने अन्य कामांसाठी वापरला. आम्ही हे प्रकल्प रद्द करत आहोत; कारण ते उभे करण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. केंद्राकडून नवा निधी येण्यासाठी अगोदर या तीन प्रकल्पांसाठीचा निधी परत पाठविणे किंवा विनियोग प्रमाणपत्र केंद्रास सादर करणे गरजेचे आहे, असे काब्राल यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या उपस्थितीत सांगितले. राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून चौदा कोटी रुपये काढून ते केंद्राला परत करील. त्यानंतर आम्ही सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात उभे करणार आहोत, असे काब्राल म्हणाले.
४५0 कोटींच्या प्रकल्पांचे प्रस्ताव आम्ही केंद्रास सादर केले आहेत. गोवा हे थेट विमान सेवेचे केंद्र व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. दाबोळी विमानतळावर थेट विदेशातून येणाऱ्या विमानांसाठी सात रिकामे स्लॉट्स आहेत. ते आम्हाला उपलब्ध होणार आहेत, असे काब्राल यांनी सांगितले. विमानांसाठी वेळेत सवलत देण्याची मागणी आम्ही केली असून ती देखील मान्य होईल, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: 14 crore tourism projects canceled; Center funds back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.