‘१०८’ कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना घेराव

By Admin | Updated: April 1, 2015 01:54 IST2015-04-01T01:50:41+5:302015-04-01T01:54:27+5:30

पणजी : आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार, दि. ३१ रोजी उसगाव येथे जाऊन एका कार्यक्रमानिमित्त

'108' employees clash with Chief Minister | ‘१०८’ कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना घेराव

‘१०८’ कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना घेराव

पणजी : आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार, दि. ३१ रोजी उसगाव येथे जाऊन एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना घेराव घातला. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक महिला कर्मचाऱ्यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केल्याचे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला.
मुख्यमंत्री मंगळवारी फोंडा व उसगाव येथे एका विद्यालयात लॅपटॉप वाटप कार्यक्रमासाठी गेले होते. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी उसगाव येथे जाऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. या वेळी आम्ही आमच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले. मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्येबाबत कोणताही निर्णय दिला नाही. मात्र, महिला रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांवर टीप्पणी केली असल्याची टीका कर्मचाऱ्यांनी केली. ‘महिला कर्मचारी अशा उन्हात उपोषणाला बसल्यास त्यांचा रंग काळवंडणार, तुम्ही का उपोषण करता, अशाने तुमचे लग्न जमणे कठीण होईल,’ असे विधान पार्सेकर यांनी केल्याचा दावा आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी महिलांवर अशी टिप्पणी करणे अशोभनीय आहे. त्यांना कर्मचाऱ्यांची काळजी असल्यास आमच्या समस्या सोडवाव्यात. ड्युटीवर होणारे त्रास, रात्रीच्या वेळी सुरक्षा पुरविणे या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे. महिलांची चिंता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विवाहाबाबत नाही तर सुरक्षिततेबाबत आणि स्वावलंबनासाठी नोकरी देण्याबाबत चिंता करावी, अशी मागणी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांनी केली.
आझाद मैदानावर गेल्या तेरा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी आपला प्रश्न सोडविण्यासाठी आता ‘जिथे तिथे मुख्यमंत्री भेट’ अवलंबिली आहे. मुख्यमंत्र्यांना रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना भेटण्यास वेळ नाही म्हणून आता आम्हीच राज्यभर मुख्यमंत्री जातील तिथे जाऊन त्यांना घेराव घालणार असल्याचे १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी जाहीर केले आहे.
कर्मचाऱ्यांना सहकार्य करणारे आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनीही त्यांच्यासोबत उपोषणाला बसावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. गेल्या बारा दिवसांपासून उपोषणाला बसलेली महिला कर्मचारी रेश्मा गावकर हिची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला गॉमेकॉत दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही उपोषणाला बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना इस्पितळाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. सरकार अजून किती दिवस या परिस्थितीकडे डोळेझाक करणार आहे, असा प्रश्न घाटे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

Web Title: '108' employees clash with Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.