विदेशींच्या जमीन खरेदीची १०० प्रकरणे निकालात
By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T01:06:28+5:302014-12-27T01:11:05+5:30
गोव्यातील २२ मालमत्ता जप्त

विदेशींच्या जमीन खरेदीची १०० प्रकरणे निकालात
पणजी : गोव्यात ‘फेमा’चे (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) उल्लंघन करून विदेशींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. वर्षभरात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अशी सुमारे शंभर प्रकरणे चौकशीअंती निकालात काढली. तसेच २२ मालमत्ता जप्त केल्या.
गोव्यात विदेशींकडून अनेक शेतजमिनीही खरेदी करण्यात आल्या. पोर्तुगीजकालीन जुनी घरे खरेदी केली गेली. ‘फेमा’चे उल्लंघन करून बऱ्याच मालमत्ता खरेदी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते. विदेशी व्यक्ती गोव्यात शेतजमीन खरेदी करू शकत नाही. काही विदेशी व्यक्तींनी जमीन खरेदीचे व्यवहार करता यावेत म्हणून कंपन्या स्थापन केल्या व त्या कंपन्यांवर संचालक म्हणून गोमंतकीयांना घेतले. सध्या आणखी सुमारे दोनशे प्रकरणांची चौकशी ईडीकडून चालू आहे.
२२ मालमत्ता जप्तीची कारवाई ईडीने केल्यानंतर त्या कारवाईस काही विदेशी व्यक्तींनी मुंबईतील फेमाविषयक अधिकारिणीसमोर आव्हान दिले आहे. तेथे सुनावणी सुरू आहे. जप्त केलेल्या मालमत्ता विशेषत: उत्तर गोव्याच्या किनारी भागात आहेत. ईडीचे पश्चिम विभागीय विशेष संचालक सज्जद नक्वी, आयपीएस हे शुक्रवारी गोव्यात होते. पाटो येथील ईडीच्या कार्यालयात नक्वी उपस्थित राहिले व त्यांनी अनेक विदेशी व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेतले. फेमातील तरतुदी व अन्य कायदेशीर प्रक्रिया संचालक नक्वी यांनी या व्यक्तींना समजावून सांगितल्या.
तसेच प्रलंबित प्रकरणे शक्य तेवढ्या लवकर ईडीकडून निकालात काढली जातील, याची ग्वाही दिली. सुमारे वीस विदेशी व्यक्ती शुक्रवारी नक्वी यांना भेटल्या. मालमत्ता
खरेदी प्रकरणी या वीस व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. फेमाचे उल्लंघन त्यांनी केले आहे काय, हे तपासून पाहिले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)