राज्यातील १ लाख ४२ मतदार वगळले; विजय-पराजयाची समीकरणेही बदलण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:03 IST2025-12-17T12:03:13+5:302025-12-17T12:03:13+5:30
राजकीय पक्षांना 'बूथ मॅनेजमेंट' नव्याने करावे लागणार, वास्को, कुडतरीसह सांताक्रुझमध्ये सर्वाधिक मतदार झाले कमी

राज्यातील १ लाख ४२ मतदार वगळले; विजय-पराजयाची समीकरणेही बदलण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचा सविस्तर अहवाल जाहीर झाला असून वास्को विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ७,५३५ नावे वगळण्यात आलेली आहेत. काही मतदारसंघांमध्ये मतदारसंख्या लक्षणीय कमी झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये विजय-पराजयाची समीकरणे बदलू शकतात. राजकीय पक्षांना 'बूथ मॅनेजमेंट' नव्याने करावे लागेल.
मृत्यू, कायमचे स्थलांतर, पत्त्यावर सापडू न शकलेले, दुहेरी नोंदणी आणि इतर कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली असून मसुदा याद्या खुल्या करण्यात आल्या आहेत. या यादीनुसार उत्तर गोव्यात आता ५,०८,३९५ तर दक्षिण गोव्यात ५,७६,६०७ मतदार राहिले आहेत. राज्यात एकूण ११,८५,०३४ मतदार होते. पैकी १,०००,४२ नावे वगळण्यात आली. २५,५७४ जण मृत झाले. २९,७२९ जण दिलेल्या पत्त्यावर सापडू शकले नाहीत. ४०,४६९ जणांनी कायम स्थलांतर केले आहे. १,९९७ जणांनी इतरत्र नोंदणी केली आहे तर २,२७३ नावे इतर कारणास्तव वगळली.
वास्को मतदारसंघात ३६,४०० मतदार होते. यापैकी ८६२ मृत झाले. २,४४० जण पत्त्यावर सापडू शकले नाहीत. ४,०५३ जणांनी इतरत्र कायमस्वरूपी स्थलांतर केले. ५८ जणांनी अन्यत्र मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे तर १२२ नावे इतर कारणास्तव वगळण्यात आली.
पुनरिंक्षण : मृत, स्थलांतरीत, दुहेरी नोंदणीला दणका
निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षण प्रक्रियेत मृत, स्थलांतरीत, दुहेरी नोंदणी असलेली नावे कमी केली आहेत. यामध्ये सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघात ४००१ नावे वगळली. येथे २९,८४९ मतदार होते पैकी ९७५ मृत झाले. १,१२१ जण पत्त्यावर सापडू शकले नाहीत. १,७३४ जणांनी कायम स्थलांतर केले. ५१ जणांनी इतरत्र मतदार म्हणून नोंदणी केली आहे तर १२० नावे इतर कारणास्तव वगळली.
उत्तर गोव्यात एकूण ५,५३,०२४ मतदार होते. पैकी १३,१९६ मृत झाले. ११,८२३ जण दिलेल्या पत्त्यावर सापडू शकले नाहीत. १७,३९१ जणांनी स्थलांतर केले. १,०३९ जणांनी इतरत्र नोंदणी केलेली आहे. तर १,१९० नावे इतर कारणास्तव वगळण्यात आली. उत्तर गोव्यात एकूण ६,३२,०१० मतदार होते. पैकी १२,३७८ मृत झाले. १७,९०६ जण दिलेल्या पत्त्यावर सापडू शकले नाहीत. २३,०७८ जणांनी कायम स्थलांतर केले. ९५८ जणांनी इतरत्र मतदार म्हणून आपली नोंदणी केलेली आहे तर १०८३ नावे इतर कारणास्तव वगळण्यात आली.
पणजी, ताळगांव, सांताक्रूझसारख्या शहरी व उपनगरी भागात स्थलांतर, भाडेकरू आणि दुहेरी नोंदणीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. पणजी मतदारसंघात ३,६३० ताळगांवमध्ये ३,९५१, पर्वरीत ३४२८, साळगावमध्ये ३,२८५ नावे वगळण्यात आली आहेत. कुडतरीत ४,४७५, फातोडर्ध्यात ४,०४०, मुरगांवमध्ये ३,५३१, मडगांवमध्ये ३,८८९ नावे वगळलीत. वास्को, मुरगाव बंदर भागात कायमस्वरूपी स्थलांतर आणि अनुपस्थित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. सर्वात कमी ७८५ नावे सांगेत वगळली. येथे २६,७६३ मतदार होते पैकी ३१३ जणांचा मृत. १७९ जण पत्त्यावर सापडू शकले नाहीत. २४८ जणांनी कायम स्थलांतर केले. १२ जणांनी इतरत्र मतदार म्हणून नोंदणी केली आहे तर ३३ नावे इतर कारणास्तव वगळण्यात आली.
देश-विदेशात स्थलांतर
गोव्यात नोकऱ्यांची संधी नसल्याने गोमंतकीय तरुण अन्य राज्यांत किंवा विदेशात स्थलांतरित होत आहेत. याचा परिणाम मतदार यादीवर होत आहे. या अहवालातून सामाजिक-आर्थिक वास्तवही स्पष्टपणे समोर आले आहे.
हरकती, सूचना मागवल्या
दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मसुदा मतदार यादी सुपूर्द केली. मसुदा यादीविषयी काही दावे अथवा हरकती असल्यास आजपासून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दावे, हरकती १५ जानेवारीपर्यंत सादर करता येतील. अंतिम मतदारयादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित केली जाईल.