जि.प., पं.स. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडा
By Admin | Updated: January 23, 2017 00:52 IST2017-01-23T00:52:34+5:302017-01-23T00:52:34+5:30
फेब्रुवारी महिन्यात होणारी गडचिरोली जिल्हा परिषद व बाराही पंचायत समित्या गणाच्या निवडणुकीचे काम अचूक व सुरळीत पार पाडण्यात यावे, ...

जि.प., पं.स. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडा
निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचे निर्देश : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गडचिरोलीत आढावा
गडचिरोली : फेब्रुवारी महिन्यात होणारी गडचिरोली जिल्हा परिषद व बाराही पंचायत समित्या गणाच्या निवडणुकीचे काम अचूक व सुरळीत पार पाडण्यात यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रविवारी निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी आंधळे, तळपादे, टोनगावकर, राममूर्ती, इटनकर, चांदूरकर, विजय मुळीक, निलावार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व नोडल अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या आठ तालुक्यात १६ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यात २१ फेब्रुवारी रोजी एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या चार तालुक्यात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा व निवडणूक कामाचा संपूर्ण आढावा आयुक्त सहारिया यांनी यावेळी घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)
मेळाव्यातून जनजागृती
पहिल्या टप्प्यात ४ लाख ३६ हजार ५५२ तर दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६० हजार २४७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदार जनजागृतीसाठी जिल्हा परिषद गटक्षेत्रनिहाय जनजागृती मेळावे घेण्यात येत आहे. गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्रकातून जनजागृती सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली.
अतिसंवेदनशील क्षेत्रातील काही मतदान केंद्र सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वेळेवर हलविण्याचे नियोजन असल्याचे एसपी देशमुख यांनी सांगितले.