सिरोंचा तालुक्यात रेतीचा अवैध उपसा जोमात
By Admin | Updated: November 23, 2014 23:18 IST2014-11-23T23:18:45+5:302014-11-23T23:18:45+5:30
रेती घाटाची मुदत संपूनही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे खनिकर्म व महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागत आहे.

सिरोंचा तालुक्यात रेतीचा अवैध उपसा जोमात
सिरोंचा : रेती घाटाची मुदत संपूनही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे खनिकर्म व महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागत आहे.
सिरोंचा तालुक्यात कारसपल्ली, मेडारम माल, प्राणहिता नदीवरील नगरम नदीघाट, नगरम- चिंतलपल्ली घाट, कंबालपेठा घाट, रेगुंठा, प्राणहिता नदीवरील रेगुंठा नदीघाट, येर्रावागू नाला, पेंटीपाका चेक हे आठ रेतीचे घाट आहेत. या सर्व घाटांमधून वैध पद्धतीने रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली आहे. यावर्षी रेतीचा उपसा करण्यासाठी अजूनपर्यंत लिलाव झाला नाही. त्यामुळे नदीतून रेतीचा उपसा करण्याचा अधिकार नसतांनाही आठही नदीघाटांमधून खुलेआम रेतीची तस्करी केली जात आहे. कारसपल्ली नाल्यातून दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत आहे. सिरोंचा तालुक्यात विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. या कामांसाठी रेतीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रेती तस्कर रेतीचा उपसा करीत आहेत.
रेतीची तस्करी रोखण्यासाठी कोतवालापासून तर तहसीलदारापर्यंतची अनेक कर्मचारी महसूल विभागात कार्यरत आहेत. मात्र आजपर्यंत एकाही रेती तस्करावर कारवाई करण्यात आली नाही. गावातील रेती घाटावरून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती प्रत्येक कोतवाल, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आहे. मात्र याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रेती तस्कर व या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचेच साटेलोटे आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
पर्यावरण विभागाच्या नियमानुसार एका विशिष्ट खोलीपर्यंतच रेतीचा उपसा करण्यात येते. मात्र रेतीतस्करांकडून या नियमांचे सर्रास उलंघन केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन रेती तस्करी रोखण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)