देसाईगंज येथील ५० नाट्य कंपन्यांवर झाडीपट्टी रंगभूमीचा भार

By Admin | Updated: November 3, 2015 00:42 IST2015-11-03T00:42:41+5:302015-11-03T00:42:41+5:30

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे पूर्व विदर्भातील जिल्हे झाडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते.

Zodiac trends of 50 drama companies at Desaiiganj | देसाईगंज येथील ५० नाट्य कंपन्यांवर झाडीपट्टी रंगभूमीचा भार

देसाईगंज येथील ५० नाट्य कंपन्यांवर झाडीपट्टी रंगभूमीचा भार

परंपरा कायम : दिवाळीनंतर गावागावांत नाट्य प्रयोगाची राहणार रेलचेल
विष्णू दुणेदार तुळशी
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे पूर्व विदर्भातील जिल्हे झाडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या झाडीत नाट्यपरंपरेचे वेड फार आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही हौशी रंगभूमी आहे. हौशी रंगभूमीतून सध्या झाडीपट्टीत व्यावसायिक रंगभूमी अस्तित्वात आली असून देसाईगंज हे नाट्यकंपन्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. सद्य:स्थितीत देसाईगंज येथील ५० नाट्यकंपन्या झाडीपट्टी रंगभूमी सजवित आहेत, हे विशेष!
झाडीपट्टीत बैलांचा शंकरपट व मंडई हे नाट्य आयोजनाचे मुख्य आकर्षण आहे. गाव कमी लोकसंख्येचे असले तरी झाडीपट्टीत बैलांचा शंकरपट किंवा मंडईचे आयोजन हमखास होत असते. सध्या बैलांच्या शंकरपटावर कायद्याने बंदी असली तरी मंडईच्याच्या निमित्ताने नाटकांच्या आयोजनाची परंपरा झाडीतील लोक जोपासत आहेत .
प्रसिद्ध संस्कृत नाटककार भवभुती यांचा वारसा लाभलेली जुनी नाट्य परंपरा झाडीपट्टीत अस्तित्वात असून गावोगावी अनेक नाट्य मंडळे अस्तित्वात आहेत. मराठी रंगभूमीच्या समृद्ध काळात पुण्या- मुंबईचे प्रसिद्ध व्यावसायिक नाट्यमंडळे विदर्भात आपली नाटके सादर करीत आहेत. आजघडीला मात्र झाडीपट्टीतील नाट्यकलावंतानी स्वत:ची स्वतंत्र झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमी निर्माण केली आहे.
अप्रतिम सिनसिनेरी, संगीत दिग्दर्शनासाठी हार्मोनियम वादक, तबला वाजविणारे जाणकार, नायक -खलनायकाच्या भूमिका साकारणारे भारदस्त कलावंत, विनोदी भूमिका हमखास साकारणारे विनोदी कलावंत आणि झाडीपट्टी रंगभूमीला सावरणारा आश्रयदाता रसिक प्रेक्षकवर्ग तयार करण्यात झाडीपट्टी रंगभूमी यशस्वी झाली आहे. नाटकांना तुफान गर्दी करणाऱ्या या झाडीपट्टी रंगभूमीने अजूनही संगीत रंगभूमी जिवंत ठेवली आहे. झाडीपट्टी रंगभूमीला समृद्ध परंपरा असून रात्रभर चालणारी नाटके या रंगभूमीचे वैशिष्ट्य आहे. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळातही झाडीपट्टी रंगभूमीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले.

दोन हजार लोकांना रोजगार देणारी लोकव्यवहार रंगभूमी
देसाईगंज येथे आजघडीला ५० व्यावसायिक नाट्यकंपन्या अस्तित्वात असून गावोगावी होणाऱ्या नाटकांसाठी येथून बुकिंग केली जाते. एक नाट्यकंपनी जवळपास ४० लोकांना रोजगार देत असल्याने झाडीपट्टी रंगभूमी खऱ्या अर्थाने रोजगाराभिमुख रंगभूमी बनली आहे. झाडीपट्टीत दरवर्षी नाटके सादर होत असतात. अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात रंगभूमीचा सिंहाचा वाटा आहे. साक्षरतेचे प्रमाण अल्प असलेल्या समाजात नाटकांच्या माध्यमातून पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्य - संस्कृती व राजकीय स्थित्यंतरे आदींचे ज्ञान निरक्षर जनतेला नाटकांच्या माध्यमातून दिले जाते. नाटक वरवर मनोरंजनाचे साधन वाटत असले तरी प्रबोधनाचे मोलाचे कार्य पिढ्यान्पिढ्या झाडीपट्टी रंगभूमीतून होत आहे. निमित्त नाटकाचे असले तरी अनेक उपवर मुलामुलींचे विवाह या निमित्ताने घडून येण्यास चालना मिळते. म्हणून झाडीपट्टी रंगभूमी निव्वळ हौस नसून ती लोकव्यवहार रंगभूमी झाली आहे.

Web Title: Zodiac trends of 50 drama companies at Desaiiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.