सिरोंचा तालुक्यातील धानाचे पीक जोमात
By Admin | Updated: April 23, 2017 01:34 IST2017-04-23T01:34:53+5:302017-04-23T01:34:53+5:30
विंधन विहीर व सिंचन विहिरीच्या पाण्याचा वापर करून सिरोंचा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टरवर

सिरोंचा तालुक्यातील धानाचे पीक जोमात
उत्पादनवाढीची अपेक्षा : दोन हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर धानाची लागवड
सिरोंचा : विंधन विहीर व सिंचन विहिरीच्या पाण्याचा वापर करून सिरोंचा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. यावर्षी उन्हाळी धानपिकासाठी वातावरण चांगले असल्याने धानपीक जोमात असून मागील वर्षीच्या तुलनेत अधिक उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिरोंचा तालुक्यात गोदावरी व प्राणहिता या दोन नद्या वगळता मोठी नदी नाही. त्याचबरोबर सिंचनासाठी मोठे धरणही उपलब्ध नाही. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विंधन विहीर खोदली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सिंचन विहिरी खोदल्या आहेत. या विहिरींच्या पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी जवळपास दोन हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड झाली आहे. अगदी सुरुवातीपासूनच धानासाठी चांगले हवामान असल्याने धानपीक जोमाने वाढत आहे. सद्य:स्थितीत धानपीक गर्भात आहे. पुढील एक महिन्यात धानाचे उत्पादन हाती येणार आहे.
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश शेतकरी उन्हाळी धान तेलंगणात राज्यात नेऊन विक्री करतात. उन्हाळी धानपिकाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध होते. उन्हाळी धानपीक निघताच खरीपाच्या पिकांसाठी मशागत करण्यास सुरुवात होते. (शहर प्रतिनिधी)