अर्थकारणाच्या विळख्यात जि.प. आरोग्य विभाग

By Admin | Updated: December 23, 2015 02:02 IST2015-12-23T02:02:04+5:302015-12-23T02:02:04+5:30

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेवेचे धिंडवडे नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने निघाले, हे अतिशय चांगले झाले.

Zip Health Department | अर्थकारणाच्या विळख्यात जि.प. आरोग्य विभाग

अर्थकारणाच्या विळख्यात जि.प. आरोग्य विभाग

दुय्यम अधिकाऱ्यांकडे पदभार : चौधरीच्या निलंबनाने होईल का शुद्धीकरण; पदाधिकाऱ्यांच्या दबावात काम करतात प्रमुख
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेवेचे धिंडवडे नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने निघाले, हे अतिशय चांगले झाले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग याशिवाय वठणीवर येऊ शकला नसता. पदाधिकाऱ्यांचा वारंवार हस्तक्षेप व त्यांच्यासमोर नांगी टाकणारे आरोग्य विभागाचे प्रमुख यांच्यामुळे या आरोग्य विभागात आर्थिक दुकानदारी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पैसे देऊन पात्रता नसणारे लोक मानाची व ‘अ’ वर्गाची पदे बळकावून बसले होते. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा केवळ नावालाच उरली असल्याचे दिसून येते.
गेल्या दीड वर्षांच्या काळात साथ रोगाने कमीतकमी ३० ते ३५ लोकांचा मृत्यू झाला. परंतु आरोग्य यंत्रणेला याचे कोणतेही सोयरेसुतक नव्हते. काही ठराविक पदाधिकाऱ्यांना जमवून टाकले म्हणजे डीएचओवर दबाव टाकून आरोग्य यंत्रणा आपल्या कब्जात करू पाहणाऱ्यांची येथे गर्दी निर्माण झाली होती. या गर्दीतले डॉ. रवींद्र चौधरी हे एक मोहरे होते. वर्ग २ चे अधिकारी असतानाही यांच्याकडे तब्बल तीन पदांचा पदभार देण्यात आला होता. ते साथरोग विभागाचे काम सांभाळत होते. याशिवाय औषध भांडार विभागाचेही काम त्यांच्याचकडे देण्यात आले होते. याशिवाय वर्ग १ च्या अधिकाऱ्याकडे (डॉक्टरकडे) जिल्हा प्रशिक्षण पथकाचा कारभार द्यावा लागतो. मात्र गडचिरोलीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हाही पदभार चौधरींकडेच दिला होता. चौधरींवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची एवढी मेहरबानी का होती, याचे उत्तर अर्थकारणात आहे, अशी खुली चर्चा आरोग्य विभागाच्या वर्तुळात रंगत आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक पीएचसींना वैद्यकीय अधिकारी नाही. डॉक्टर द्या म्हणून वारंवार मागणी केली जाते. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी दिले जात नाही. प्रतिनियुक्त्यांवर तेच ते डॉक्टर व आरोग्य कर्मचारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या दहा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. येथून कसा पैसा काढून द्यायचा यात अवगत झालेली आरोग्य यंत्रणा डीएचओंच्या दिमतीला आहे. नागपुरात राहून गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात आरोग्यसेवा देणाऱ्या अनेक डॉक्टर महिन्याच्या संपूर्ण दिवसांचा पगार उचलतात. कुठल्याही भेटी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना न देता तालुका आरोग्य अधिकारी प्रवासाच्या डायऱ्या तयार करून त्या आरोग्य विभागाचे प्रमुख डोळे झाकून मंजूर करतात. हा सारा खेळखंडोबा जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेत सुरू आहे. ज्या महिला डॉक्टरने जिल्हा परिषद अध्यक्षांविरोधात तक्रार केली, तिची चौकशी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने लावून त्या महिला डॉक्टरला मानसिक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. काही पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून महिना दोन हजार रूपये मागतात. जे कर्मचारी पैसे देत नाही. त्यांच्या खोट्या तक्रारी करून चौकश्या लावण्याचे काम करतात, असाही गंभीर आरोप एका आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आला. आरोग्य यंत्रणेच्या वर्तुळात सध्या हा चर्चेचा विषय आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कानावर हा सारा प्रकार घालण्यात आला. परंतु केवळ ऐकून घेण्याच्या पलिकडे याची गंभीर दखल अद्याप घेण्यात आलेली नाही, हे विशेष!
यामुळे जिल्ह्यातील प्रामाणिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. आपण दुर्गम भागात राहून सेवा देतो, मात्र शहरात डीएचओ आॅफिसमध्ये बसून व त्यांच्या वर्तुळात राहून आपलाचे काही सहकारी आरामाची सेवा बजावत आहेत, ही तफावत स्पष्टपणे दिसत असल्याने अनेक चांगले डॉक्टर या साऱ्या घाणेरड्या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. विद्यमान परिस्थितीत १२ पैकी जवळजवळ ५ ते ६ तालुका आरोग्य अधिकारी हे गट ‘ब’ दर्जाचे असूनही त्यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. यांच्यावरच वारंवार तालुका आरोग्य अधिकारी पदासाठी मर्जी का दाखविली जाते, या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडे नाही. त्यांच्याच फाईली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जातात. हे चापलुसबाज लोक सकाळ, संध्याकाळ पदाधिकाऱ्यांच्या दरवाजावर उभे असल्याचे दिसून येते. पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला बुक्के घेऊन व जाहिरातीचे पैसे घेऊनही हे लोक तयार असतात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना पदांची खैरात केली जाते. या जिल्ह्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीला हा सारा गंभीर प्रकार आजवर दिसला नाही. साथीच्या रोगाने गेल्या वर्षभरात ३० लोक मेलेत त्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याची साधी दखल घेतली नाही. अखेरीस ब्रह्मपुरीचे आ. विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’चे कात्रण विधानसभेत झळकावून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले. तेव्हा आरोग्य मंत्र्यांना साथरोग अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा करावी लागली. त्यानंतरही आता हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी गडचिरोलीतून नागपुरात बदलून गेलेले एक अधिकारी आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठांना भेटत आहे. गडचिरोलीच्या आरोग्य यंत्रणेचे नुसते आॅपरेशन करून भागणार नाही, तर येथे शवविच्छेदनच करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही यंत्रणा वठणीवर येणार नाही. पदाधिकाऱ्यांचा वारंवार हस्तक्षेप जिल्हा आरोग्य अधिकारी खपवून घेत असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे पदाधिकाऱ्यांच्या पायाशी काम सोडून लोळण घेत असल्याचे दुर्देवी चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Zip Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.