जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
By Admin | Updated: May 15, 2015 01:27 IST2015-05-15T01:27:55+5:302015-05-15T01:27:55+5:30
शिक्षकांप्रमाणेच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी शासनाने आॅनलाईन वेतन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
कामबंद आंदोलनाचा इशारा : आॅनलाईन वेतन सेवार्थ प्रणालीचा फटका
गडचिरोली : शिक्षकांप्रमाणेच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी शासनाने आॅनलाईन वेतन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. मात्र सदर आॅनलाईन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम मंदगतीने सुरू असल्याने जि.प. अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा मुख्यालयी, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर हजारो कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जि.प. अंतर्गत ४१२ परिचारिका दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याची सेवा देत आहेत. तसेच ५५ महिला आरोग्य सहायीका कार्यरत आहेत. आॅनलाईन वेतन सेवार्थ प्रणालीच्या अडचणीवरून जि.प.चे कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाविना काम करीत आहेत.
वेतन थकल्यामुळे जि.प. अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी बचत गटांकडे कर्ज घेत आहेत, अशी माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कर्जाचे हप्ते फेडण्यास अडचण
जि.प. अंतर्गत विविध विभागात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांनी प्लॉट खरेदी, घर बांधकाम तसेच लग्न कार्य, मुलांचे शिक्षण आदी कामांसाठी बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतले आहे. नियमित पगाराशी या कर्जाचे हप्ते जोडण्यात आले आहे. परंतु गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन झालेले नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आता बँकांकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.
आॅनलाईन वेतन सेवार्थ प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे शासन निर्देश आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आॅनलाईन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. सदर आॅनलाईन सेवार्थ प्रणाली पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन काढता येणार नाही. आॅनलाईन सेवार्थ प्रणाली लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- संपदा मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प. गडचिरोली
जुन्या पध्दतीने वेतन काढा
कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी आॅनलाईन सेवा प्रणालीची अट न ठेवता जुन्या पध्दतीनेच वेतन काढण्यात यावे, अशी मागणी जि.प. नर्सेस संघटनेनी केली आहे. वेतन मिळण्यास विलंब झाल्यास आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन छेडतील, असा इशारा नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.