जि.प. राकाँ-काँग्रेस आघाडीच्या ताब्यात

By Admin | Updated: September 21, 2014 23:49 IST2014-09-21T23:49:54+5:302014-09-21T23:49:54+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य

Zip In the custody of Rakon-Congress alliance | जि.प. राकाँ-काँग्रेस आघाडीच्या ताब्यात

जि.प. राकाँ-काँग्रेस आघाडीच्या ताब्यात

भाजपातील अंतर्गत वाद उफाळले; भाजप सदस्यांनीही केले काँग्रेसलाच मतदान
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील नाट निवडून आले आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कुत्तरमारे यांना २८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वर्षा कौशिक यांना २२ मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जीवन नाट यांना २८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांना २० मते मिळाली. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत मतदानाला युवाशक्ती आघाडीच्या तिकीटावर निवडून आलेल्या पल्लवी लाडे या सदस्य गैरहजर होत्या. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे यशवंत धुळसे व भाजपचे सहयोगी अपक्ष सदस्य नामदेव सोनटक्के तटस्थ राहिले. गेल्यावेळी या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप, अशी सत्ता होती. यावेळी काँग्रेस-राकाँ आघाडीला यश मिळाले आहे.
५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडली. सकाळी ११.३० वाजतापासून निवडणूक प्रक्रियेला जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात प्रारंभ झाला. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीकडून परशुराम कुत्तरमारे, भारतीय जनता पक्षाकडून संध्या तामदेव दुधबळे व पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती आघाडीच्या व आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वर्षा कौशिक, भाजपचे यशवंत धुळसे व काँग्रेसचे जीवन नाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पाच सदस्यांचे सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर उपाध्यक्ष पदासाठी सहा सदस्यांनी १० नामांकन अर्ज दाखल केलेत. यामध्ये काँग्रेस-राकाँ आघाडीतर्फे जीवन पाटील नाट, वसा-पोर्ला क्षेत्राचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ भोवते, अपक्ष सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, सुरेंद्रसिंह चंदेल गटाच्या विद्यमान बांधकाम सभापती छाया कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ बंडखोर नेते अतुल गण्यारपवार व भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संध्या दुधबळे, यशवंत धुळसे व जीवन नाट यांनी आपले अर्ज मागे घेतले. तर उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणारे विश्वनाथ भोवते, जगन्नाथ बोरकुटे, छाया कुंभारे, डॉ. तामदेव दुधबळे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी काँग्रेस-राकाँ आघाडीचे परशुराम कुत्तरमारे व नव्यानेच भाजपात दाखल झालेल्या वर्षा कौशिक यांच्यात लढत झाली. या लढतीत परशुराम कुत्तरमारे यांना २८ तर कौशिक यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे जीवन नाट व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांच्यात लढत झाली. नाट यांना २८ तर गण्यारपवार यांना २० मते मिळाली. या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नामदेव सोनटक्के व यशवंत धुळसे हे दोन सदस्य तटस्थ राहिले व भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे, संध्या दुधबळे यांनी काँग्रेसचे जीवन नाट यांना मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी देवेंद्रसिंह यांनी काम पाहिले.

Web Title: Zip In the custody of Rakon-Congress alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.