जस्त व लोहाची कमतरता
By Admin | Updated: May 15, 2017 01:44 IST2017-05-15T01:44:15+5:302017-05-15T01:44:15+5:30
जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील २७ हजार ३१८ मृद नमुन्यांची तपासणी केली असता,

जस्त व लोहाची कमतरता
मात्रा देण्याचा सल्ला : जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाचे निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील २७ हजार ३१८ मृद नमुन्यांची तपासणी केली असता, जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये विशेष करून जस्त व लोहाची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या योग्य वाढीसाठी प्रती हेक्टरी २५ ते ३० किलो झिंक सल्फेटचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
जमिनीच्या गुणधर्मानुसार पिकांची लागवड व खतांची मात्रा देता यावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक गावातील जमिनीच्या गुणधर्माचा अभ्यास करण्याचे निर्देश जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या कार्यालयाने २०१६-१७ या वर्षात सुमारे २७ हजार ३१८ नमुन्यांची चाचणी केली. चाचणीवरून आढळलेल्या गुणधर्मावरून जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी ठरविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नत्र, स्पुरद व पालाश यांचा निर्देशांक अनुक्रमे १.३७, १.१० व २.५९ एवढा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारसी प्रमाणे नत्राचे प्रमाण मध्यम आहे. स्पुरद कमी प्रमाणात आढळले आहे. त्यामुळे २५ टक्के अधिकचे स्पुरद पिकांना देणे गरजेचे आहे. तर पालाशचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे पालाशचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमिनी सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आढळून आली आहे. पिकांच्या वाढीमध्ये सुक्ष्म मुलद्रव्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र जमिनीमध्ये जस्त व लोह या सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांनी प्रती हेक्टरी २५ ते ३० किलो झिंक सल्फेटचा वापर करावा, असे सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यात नऊ मृदमाला आहेत. जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी असल्याचे आढळून आले आहे. मृद चाचणी विभागाने ठरवून दिल्यानुसार खतांची मात्रा देण्याचा सल्ला दिला आहे.
४० हजार मृद चाचणीचे लक्षांक
२०१७-१८ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने ४० हजार ९७६ मृद नमुन्यांची चाचणी करण्याचे लक्षांक ठरविण्यात आले आहे. यामध्ये २० हजार ४८८ सर्वसाधारण मृद नमुने व २० हजार ४८८ सुक्ष्म नमुने यांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात ६७५ पाण्याचे नमुने तपासणीचे लक्षांक ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ १५ पाणी नमुने गोळा करण्यात आले व त्यांची तपासणी करण्यात आली. जमिनीचा गुणधर्म लक्षात येण्याच्या दृष्टीने पाणी तपासणीसुध्दा महत्त्वाची असल्याने पाणी तपासणीकडेही विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.