जिल्हा परिषद सदस्यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: December 18, 2014 01:07 IST2014-12-18T01:07:48+5:302014-12-18T01:07:48+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर काही कालावधीकरिता लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते़ ..

जिल्हा परिषद सदस्यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष
देसाईगंज : तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर काही कालावधीकरिता लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते़ मात्र हल्ली केवळ नाटकांच्या उद्घाटनाच या लोकप्रतिनिधींचा चेहरा दिसत आहे़ सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेत मांडून समस्या सोडविण्यापेक्षा प्रश्नांकडेच डोळेझाक करून स्वस्थ बसण्याला जिल्हा परिषद सदस्यांनी पसंती दिली आहे़ त्यामुळेच जिल्हा परिषद सदस्या बाबतीत सर्वसामान्य जनतेत असंतोष दिसत आहे़
देसाईगंज तालुक्यात कोरेगाव-डोंगरगाव, सावंगी-विसोरा व कुरूड-कोकडी हे तीन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत़ या तिनही जिल्हा परिषद जागा महिलांकरिता राखीव आहेत़ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेत मांडून त्या समस्या सोडविण्या साठी ग्रामीण जनतेने त्यांना निवडून आणले आहे़ जिल्हा परिषद निवडणूकीत सावंगी-विसोरा ही जागा भाजपा, कुरूड - कोकडी येथून कॉग्रेस तर कोरेगांव - डोंगरगाव ही जागा युवाशक्तीने विजय मिळविला होता. निवडणुकीत अनेक आश्वासने मतदारांना देण्यात आले. निवडून आल्यावरही सदस्यांनी अनेक आश्वासने दिली होती़ मात्र या सदस्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही़
जिल्हा परिषद सदस्य केवळ नाटकाचे उद्घाटन, शाळांच्या कार्यक्रमापुरतेच उरलेले आहेत, असे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील एकाही गावात जिल्हा परिषदे अंतर्गत कोणतेही काम झालेले नाही़ जिल्हा परिषद निवडणुकांना आता तीन वर्ष होत आले. एवढा कालावधी लोटूनही काही सदस्यांना अजूनही ग्रामीण भागातील नागरिक नीट ओळखत देखील नाही. जनसंपर्काच्या अभावामुळे ग्रामीण जनता लोकप्रतिनिधीपासून दुरावल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही पंचायत समितीचे सदस्य मात्र पदावर असताना लोकांशी सतत संपर्क ठेवून आहेत. गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत आहे. हे चित्र मात्र तीन महिला जि. प. सदस्यांबाबत तालुक्यात दिसून येत नाही. (वार्ताहर)