युवक काँग्रेसची समाजकल्याणवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:26 IST2017-11-20T22:26:22+5:302017-11-20T22:26:46+5:30
गडचिरोली येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे,....

युवक काँग्रेसची समाजकल्याणवर धडक
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे, यासाठी वसतिगृहातील विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयावर सोमवारी धडक दिली. यावेळी सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांना समस्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. भोजनाच्या दर्जात सुधारणा करावी किंवा विद्यमान कंत्राटदाराकडून कंत्राट काढून घ्यावे, पिण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात यावे, वसतिगृहातील संगणकांची दुरूस्ती करावी, ग्रंथालयात पुरेशा प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून द्यावी, पालक सभा व मासिक सभा घेण्यात याव्या, विजेचे दिवे, पंखे, स्विच दुरूस्त कराव्या, व्यायाम शाळा सुरू करावी, विद्यार्थ्यांचा राजीव गांधी योजनेअंतर्गत विमा काढावा, वसतिगृहात वृत्तपत्र करून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला निर्देश दिले जातील, त्याचबरोबर इतरही समस्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव एजाज शेख, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आशिष कन्नमवार, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआय अध्यक्ष नितेश राठोड, कवडू कुळमेथे, गौरव अलाम, आशिष नरूले उपस्थित होते.