आपल्या आमदारकीला धोका नाही

By Admin | Updated: February 23, 2017 01:25 IST2017-02-23T01:25:10+5:302017-02-23T01:25:10+5:30

राजीनाम्याच्या मुद्यावर विरोधी उमेदवार नारायण जांभुळे यांनी आपल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Your MLA is not at risk | आपल्या आमदारकीला धोका नाही

आपल्या आमदारकीला धोका नाही

पुढील सुनावणी २५ एप्रिलला : देवराव होळी यांची माहिती
गडचिरोली : राजीनाम्याच्या मुद्यावर विरोधी उमेदवार नारायण जांभुळे यांनी आपल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने माझ्या आमदारकीला स्थगीती दिली होती. या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगीती दिली असल्याने आता माझ्या आमदारकीला कुठलाही धोका नाही. आपण आमदार म्हणून काम करू शकतो, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला खासदार अशोक नेते, डॉ. भारत खटी, रमेश भुरसे, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार, सुधाकर येनगंधलवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, माझ्या राजीनाम्याच्या मुद्यावर विरोधकांनी लोकांची दिशाभूल केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगीती दिल्याने विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल रोजी आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल, असेही त्यांनी सांगितले. माझ्या संस्थेच्या प्रकरणातही जिल्हा न्यायालयाने माझ्या बाजुने निकाल दिला आहे. आता आपण पुन्हा जोमाने आमदार म्हणून विधानसभा क्षेत्रात विकास कामे करणार, असे त्यांनी सांगितले.
खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार काळात विरोधकांनी डॉ. होळी यांच्या आमदारकीच्या मुद्यावर लोकांची दिशाभूल केली. न्यायालयाने आमदारकी रद्दचा निर्णय दिल्याने आमदार म्हणून उल्लेख करता येत नाही, असा बाऊ पुढे करून लोकांची दिशाभूल केली होती. आमदार डॉ. देवराव होळी व भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच्या काळात बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आमदार डॉ. देवराव होळी यांना दिलासा दिला आहे.

Web Title: Your MLA is not at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.