गडचिरोली: मासेमारी करताना फीट आल्याने एक तरुण वैनगंगा नदीपात्रात बुडाला. तालुक्यातील गोगाव येथे १४ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विकास बिसेन मेश्राम (२६,रा. नेहरु वॉर्ड, गडचिरोली) असे बुडालेल्याचे नाव आहे.विकास मेश्राम व खुशाल भोयर (२८, दोघे रा. नेहरु वॉर्ड, गडचिरोली) हे दोघे मासेमारीचे काम करतात. १४ ऑगस्टला नित्याप्रमाणे ते सकाळी गोगाव येथे मासेमारीसाठी गेले होते. नावेतून नदीपात्रात जाऊन त्यांनी जाळे लावले. त्यानंतर ते बाहेर आले. नदीकाठी जेवण करुन ते पुन्हा नावेतून जाळ्यात अडकलेले मासे काढण्यासाठी नावेतून गेले. खुशाल भोयर हा जाळे ओढत होता तर विकास मेश्राम नाव चालवित होता. मात्र, याचवेळी विकासला फीट आल्याने तो पाण्यात पडून बुडाला. यानंतर त्याचा शोध लागला नाही. विकास मेश्राम याने नाव चालवित बाहेर येऊन ही माहिती गावात कळविली.
बचाव पथकाची धाव, शोध कार्य सुरुदरम्यान, या घटनेची माहिती होताच नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण केले. या पथकातील उपनिरीक्षक सुरेश चौधरी, सुनील चव्हाण व चमूने बुलेट प्रुफ जॅकेट परिधान करुन बचाव पथकाने विकास मेश्रामला शोधण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. मंडळाधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्याम वायकुडे, पोलिस पाटील उत्तम मुनघाटे, महसूल सेवक सुजाता शेंडे, सत्यवान भोयर, सपना रायपुरे आदी ठाण मांडून आहेत.