गणेशोत्सवात वीज चोरीवर राहणार करडी नजर
By Admin | Updated: August 25, 2016 01:10 IST2016-08-25T01:10:11+5:302016-08-25T01:10:11+5:30
गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते.

गणेशोत्सवात वीज चोरीवर राहणार करडी नजर
मंडळांना वीज दरात सवलत : महावितरणतर्फे स्वतंत्र पथकाची निर्मिती
गडचिरोली : गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. मात्र अनेक गणेश मंडळ महावितरणकडून रितसर वीज जोडणी घेत नाही. अशा गणेश मंडळांकडून वीज तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जाते. गणेश उत्सवादरम्यान वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणच्या वतीने स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गणेशोत्सवातील वीज चोरीवर करडी नजर राहणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाकडून वीज चोरीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांना वीज दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना प्रतियुनिट ३ रूपये ७१ पैसे दराने अधिकृत तात्पुरत्या स्वरूपाची वीज जोडणी देण्यात येणार आहे. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट ३ रूपये ७१ पैसे अधिक इंधनअधीभार असे वीज दर ठेवण्यात आले आहे. सदर वीज दर घरगुती वीज दरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे घरगुती अथवा वाणिज्य वीज जोडणीतून गणेशोत्सवासाठी अनाधिकृतरित्या वीज पुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महागडा राहणार आहे. धार्मिक उत्सवाकरिता अधिकृतच वीज पुरवठा घ्यावा आणि त्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व मिळावे, या उद्देशाने तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीज दरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप अथवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, तसेच गरज पडल्यास महावितरणच्या त्या-त्या भागातील अभियंत्यांशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वीज व्यवस्थेत अशी घ्या काळजी
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्याच्या परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, जेणेकरून अप्रिय घटना व धोका होणार नाही.
वीज पुरवठा व जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकित अपघात होण्याची शक्यता असते.
जवळच्या वीज खांबावरून अथवा वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून गणेश मंडळांनी वीज पुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका अधिक असते.
वीज जोडणीसाठी लागणारी तार अथवा केबल वीजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. तुटलेली अथवा लूज तार वापरू नये, अशी तार वापरावयाची असल्यास प्रमाणित इन्सुलेशन टेप लावून जोडावी.