यावर्षीही २६३ गावांना पावसाळी ‘नवसंजीवनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:40+5:302021-06-05T04:26:40+5:30
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. ...

यावर्षीही २६३ गावांना पावसाळी ‘नवसंजीवनी’
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्याला प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांला प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केले जाते. या परिमाणानुसार चार महिन्याचे धान्य संबंधित तालुक्याच्या शासकीय गोदामात पोहोचविण्यात आले. तेथून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचविले जात आहे.
काही तालुक्यात रस्त्याची कामे अर्धवट असल्यामुळे त्या मार्गावरून वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी गावांची संख्या वाढल्याचे अधिकारी सांगत आहेत.
बाधित गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली
ग्रामीण भागात रस्ते व पुलांचे जाळे दरवर्षी विणले जाते. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या दरवर्षी कमी होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात यावर्षी ही संख्या वाढल्यामुळे यामागील रहस्य काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्यावर्षी पुरवठा विभागाने नवसंजीवनी योजनेतून २५२ गावांना धान्य पुरवठा केला होता. यावर्षी त्यात वाढ होऊन २६३ गावांना धान्य पुरवठा केला जात आहे. यामुळे गेल्या वर्षभरात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघडली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
योजनेचा लाभ मिळणारी गावे
तालुका संपर्क तुटणारी गावे रेशन दुकाने पोहोचलेले धान्य
धानोरा ३८ १६ ९
मुलचेरा ६ ३ ३
अहेरी ५८ २६ १२
भामरागड ५९ २२ २०
एटापल्ली ७४ ३७ २२
सिरोंचा २८ २३ ९
एकूण २६३ १२७ ७५