यंदा भुईमुगाचा पेरा वाढला
By Admin | Updated: October 11, 2015 02:30 IST2015-10-11T02:30:54+5:302015-10-11T02:30:54+5:30
मध्यम, चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत माती असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाला मोठा वाव असतो.

यंदा भुईमुगाचा पेरा वाढला
तीन तालुक्यात अधिक प्रमाण : नदी किनाऱ्यालगतचे क्षेत्र उपयुक्त
वैरागड : मध्यम, चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत माती असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाला मोठा वाव असतो. अशा प्रकारच्या जमिनीचा भूप्रदेश मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्याला लाभला आहे. कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यात अशी भुसभुशीत शेतजमीन असल्याने या तिन्ही तालुक्यात यंदा भुईमुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्व देखील वाढत आहे. भुईमूग पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता असल्याने हे पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते. कमी उत्पादन खर्चाचे हे पीक असल्याने शेतकऱ्यांची भुईमूग पिकाला पसंती वाढली आहे. मागील दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात भुईमूग पिकाच्या पेऱ्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक भुईमुगाचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात ज्या भागात नदी किनारा लाभला आहे. त्या भागात हे पीक अधिक प्रमाणात घेतल्या जाते. मागील वर्षी गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ एस. एस. कऱ्हाडे यांनी भुईमूग शेंगा तोडणी आणि शेंगा फोडणी यंत्राद्वारे भुईमूग उत्पादकांना प्रात्यक्षिक करून दाखविले होते. या यंत्रामुळे पीक काढणीनंतरचे बरेच काम भुईमूग उत्पादक शेतकऱ्याचे हलके होते. शेतकऱ्यांचा प्रचंड वेळ यांत्रिकीकरणामुळे वाचतो. भुईमूग पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्यानंतर बाजारात या पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाला चांगला भाव मिळतो. कुरखेडा, आरमोरी व धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. (वार्ताहर)