लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जाणारा पीएलजीए सप्ताह यावर्षी निष्प्रभ ठरला आहे. २ ते ८ डिसेंबरदरम्यान सदर सप्ताह पाळून बंदचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. परंतू यावर्षी कुठेही या सप्ताहाची दहशत निर्माण करून हिंसक कारवाया करण्यात नक्षलवाद्यांना यश आले नाही.यावर्षी सदर सप्ताहाची दहशत निर्माण करण्यासाठी पीएलजीए सप्ताह सुरू होण्याच्या दोन दिवस आधी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात सीआरपीएफचे सहायक कमांडंट शहीद तर काही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर भामरागड तालुक्यात लाहेरी मार्गावर झाडे कापून पीएलजीए सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने रेड अलर्ट देऊन आपल्या यंत्रणेला सतर्क केले होते. नक्षलविरोधी पथकाने गस्त वाढवत नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले. नागरिकांनीही कोणत्याच आवाहनाला दाद न देता सप्ताहभर सर्व व्यवहार सुरू ठेवले. पोलिसांनी निर्माण केलेले भयमुक्त वातावरण आणि सतर्कता यामुळे नक्षलवाद्यांना कोणत्याही हिंसक कारवाया करणे शक्य झाले नसल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विशेष म्हणजे नक्षल सप्ताहच नाही तर गेल्या काही दिवसात नक्षलवाद्यांच्या नियमित कारवायांनाही बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोक उत्साहाने सहभागी होण्याची शक्यता आहे. आधी नक्षलवाद्यांच्या दहशतीत निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठीही लोक घाबरत होते. यावेळी मात्र चित्र वेगळे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नक्षल दहशत कमी हाेत असल्यामुळे विकासकामे मार्गी लागत आहेत.
पोलिसाची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यास जन्मठेपगडचिराेली : पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण दाेघांची हत्या करणाऱ्या नक्षल आराेपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. डुंगा उर्फ येशू उर्फ वसंतराव बापू टेकाम (३४) रा. कापेवंचा ता. अहेरी असे आराेपीचे नाव आहे. झिंगानूर परिसरातील काेपेला येथील मूळ रहिवासी असलेले नागेश पापय्या पायाम हे स्वगावी गेले हाेते. ते पाेलीस विभागात कार्यरत हाेते. २८ सप्टेंबर २००९ राेजी रात्रीच्या सुमारास आराेपी डुंगा व इतर काही नक्षलवादी नागेश यांच्या घरात शिरले. ते घरी झाेपले असताना त्यांच्यावर बंदुकीच्या गाेळ्या झाडून ठार केले. नागेश यांच्या लहान बहिणीने नक्षलवाद्यांना विराेध करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याही डाेक्यावर व कमरेवर बंदुकीची गाेळी मारून ठार केले. याबाबत झिंगानूर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. आराेपीविराेधात सबळ पुरावे आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आराेपी डुंगा उर्फ येशू याला जन्मठेप तथा सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पाेलीस उपनिरीक्षक मंगेश जगताप यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एन.एम.भांडेकर यांनी बाजु मांडली.