यंदाही तुटणार ४० गावांचा संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 01:59 IST2015-05-25T01:59:42+5:302015-05-25T01:59:42+5:30
येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने ..

यंदाही तुटणार ४० गावांचा संपर्क
अहेरी : येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने यावर्षीही या परिसरातील ४० गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटण्याची शक्यता आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसणार आहे.
अहेरी-देवलमरी मार्गावर गडअहेरी नाला आहे. या नाल्यावर पूल आहे. मात्र या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. परिणामी पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक खोळंबते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नाल्यातून किंवा पुलावरून पाणी असताना प्रवास करतात. या परिसरात सुमारे ४० गावे असल्याने या पुलाची उंची वाढवावी, याबाबतची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलाच्या बांधकामास प्रशासनाने मंजुरी दिली नाही. मागील वर्षी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी देवलमरी भागाचा दौरा केला होता. त्यावेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या पुलाची समस्या लक्षात आणून दिली होती. लवकरच पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. आ. दीपक आत्राम यांनीही दिलेला शब्द पूर्णत्वास नेला नाही. त्यामुळे आजतागायत ही समस्या कायम आहे. याचा त्रास हजारो नागरिकांना सहन करावा लागत असल्याने पुलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)