येवलीत वाद चव्हाट्यावर
By Admin | Updated: December 23, 2015 02:04 IST2015-12-23T02:04:58+5:302015-12-23T02:04:58+5:30
खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी ...

येवलीत वाद चव्हाट्यावर
गडचिरोली : खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी कामाचे कंत्राट घेतलेल्या ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केल्यामुळे येथे प्रचंड वाद उफाळला आहे. या संदर्भात येवलीच्या ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे.
येवली आदर्श सांसद ग्राम कमिटीच्या अनेक बैठका पार पडल्या यात ग्राम विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या असून विकासाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीशी समन्वय साधून ग्राम विकासाच्या योजना कार्यान्वित होत असताना येवली येथे सचिवालय परिसरात संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने याच जागेवर पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या निवासस्थानाच्या बांधकामास ग्रामस्थांनी विरोध दर्शवून या संदर्भाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पचारे यांच्याकडे केली आहे. परिचर निवासस्थानाचे बांधकाम ग्राम सचिवालय परिसरात न करता इतर दुसऱ्या ठिकाणच्या जागेवर बांधकाम करण्याचे निर्देश बीडीओंनी दिले. त्यानंतर परिचर निवासस्थानाचे बांधकाम बंद करण्यात आले. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही या कामाचे कंत्राट घेतलेल्या एका ग्राम पंचायत सदस्याने मनमानी करीत पुन्हा याच जागेवर परिचर निवासस्थानाचे खोदकाम सुरू केले. ग्राम पंचायतीच्या इतर सदस्यांचा या ठिकाणी होत असलेल्या परिचर निवासस्थानाच्या बांधकामास विरोध आहे. मात्र ग्रामस्थ, ग्रा. पं. चे इतर सदस्य यांची कोणतीही सूचना लक्षात न घेता, कंत्राटदार असलेल्या त्या ग्रा. पं. सदस्याने मनमर्जीने १३ डिसेंबरपासून परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे.
या कंत्राटदार असलेल्या ग्रा. पं. सदस्याच्या बांधकामास येवली ग्राम पंचायतीच्या सरपंचाचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमुद केले आहे.
जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ मोका चौकशी करून परिचर निवासस्थानाचे बांधकाम थांबवावे, जेणेकरून येथे ग्रामसचिवालयाची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे काम करता येईल. तसेच ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामस्थांमधील वाद संपुष्ठात येईल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.