चुकीच्या पूल बांधकामाने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: November 26, 2015 01:21 IST2015-11-26T01:21:48+5:302015-11-26T01:21:48+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी योग्य नियोजन न करता चुकीच्या पद्धतीने पूल बांधकाम केल्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे.

चुकीच्या पूल बांधकामाने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
भामरागड : सार्वजनिक बांधकाम विभागाने भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी योग्य नियोजन न करता चुकीच्या पद्धतीने पूल बांधकाम केल्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. असाच काहीसा प्रकार ताडगाव-भामरागड दरम्यानच्या मार्गावर बांधण्यात आलेल्या ठेंगण्या पुलाबाबत घडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडगाव-भामरागड या मार्गावरील नाल्यावर जेसीबीने खोदकाम करून पूल तयार केला. मात्र अत्यंत ठेंगणा व कमी रूंदीचा पूल बांधल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक नेहमीच ठप्प होते. पूल बांधकाम करताना रस्त्याची उंची वाढविण्यात आली नाही. त्यामुळे खोलगट भाग असलेल्या रस्त्यावर पाणी साचून सदर पाणी पुलावर चढते. पावसाळ्यात तीन ते चार फूट पाण्यातून ताडगाव परिसरातील नागरिकांना भामरागडला ये-जा करावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांमध्ये संगणमत होत असल्याने भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी निरूपयोगी , ठेंगणे पूल बांधण्यात आले आहेत. ताडगाव-भामरागड दरम्यानच्या मार्गावर दोन ते तीन पूलाचे काम लाखो रूपये खर्च करून करण्यात आले. मात्र या पुलाचा कोणताही फायदा नागरिकांना दळणवळणासाठी होताना दिसून येत नाही.
ताडगाव-भामरागड दरम्यानच्या मार्गावरील ठेंगण्या पूल बांधकामाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)