कालव्याचे चुकीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 02:27 IST2017-06-28T02:27:29+5:302017-06-28T02:27:29+5:30
तालुक्यातील गांधीनगर येथे चुकीच्या पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

कालव्याचे चुकीचे बांधकाम
दुर्लक्ष : गांधीनगर व लाडज येथील शेतजमीन सिंचनापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील गांधीनगर येथे चुकीच्या पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील हजारो हेक्टर शेती सिंचन सुविधेपासून वंचित राहत आहे. पाण्याअभावी दरवर्षी धानाचे पीक करपत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर व पुनर्वसित नवीन लाडज येथील शेतजमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी इटियाडोह प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला जोडून लहान कालवा तयार करण्यात आला. सदर काम ३० वर्षांपूर्वीच करण्यात आले. मात्र चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याने मुख्य कालव्यातील पाणी उपकालव्यात चढत नाही. मुख्य कालव्याजवळील भाग थोडा उंच आहे. त्यामुळे या ठिकाणी उपकालव्याची खोली अधिक प्रमाणात असणे आवश्यक होते. मात्र उंच ठिकाणी कालवा जास्त खोल खोदण्यात आला नाही. मुख्य कालव्याच्या तुलनेत उपकालवा चढ असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपकालव्यातून जात नाही. एका पाण्याअभावी धानपीक करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. योग्य पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यासाठी गांधीनगर व नवीन लाडज येथील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, इटियाडोह प्रकल्प सिंचन विभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.