मूलभूत तत्त्वाचे साहित्य लिहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:03 IST2018-01-26T00:03:23+5:302018-01-26T00:03:33+5:30
आंबेडकरी तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन मूलभूत तत्त्वांच्या साहित्याची मांडणी साहित्यिकांनी करावी, असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.

मूलभूत तत्त्वाचे साहित्य लिहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंबेडकरी तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन मूलभूत तत्त्वांच्या साहित्याची मांडणी साहित्यिकांनी करावी, असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.
महात्मा फुले-डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनातील ‘आंबेडकरी साहित्य व एकसंघ समाज व्यवस्थेसाठी आंबेडकरी चळवळीची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. दरम्यान आंबेडकरी साहित्यातील स्त्री वाद या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सरिता सातरडे यांनीही मार्गदर्शन केले. स्त्रियांना आपण विश्वासात घेतले तर त्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात, असेही मार्गदर्शन त्यांनी केले. दोन्ही परिसंवादात प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, प्रा. सरिता रामटेके, कुसूम अलाम यांनीही मार्गदर्शन केले. परिसंवादाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. राम मेश्राम, मुनीश्वर बोरकर, अॅड. शांताराम उंदीरवाडे, दिलीप गोवर्धन उपस्थित होते. संचालन सिद्धार्थ गोवर्धन तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
रात्री गायक अनिरूद्ध वनकर यांनी आंबेडकरी जलसा सादर केला.
कार्यकर्त्यांचा सत्कार
महात्मा फुले-डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात साहित्यिक वैशाली डोळस, सिने कलाकार डॉ. सरोज कुथे, प्रा. दिलीप चौधरी, सरिता सातरडे, हृदय चक्रधर, भीमराव गणवीर, डॉ. विजय रामटेके, सिद्धार्थ गोवर्धन, दिलीप गोवर्धन, वच्छला बारसिंगे, वनिता बांबोळे, प्रेमिला अलोणे, रेखा वंजारी यांच्यासह कलावंत व कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बन्सोडे, अॅड. राम मेश्राम, डॉ. दुर्गे, बांबोळे, बोरकर हजर होते.