जागतिक आरोग्य संघटनेने केला लोकबिरादरी प्रकल्पाचा सन्मान
By Admin | Updated: April 9, 2017 01:27 IST2017-04-09T01:27:29+5:302017-04-09T01:27:29+5:30
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील ४३ वर्षांपासून आरोग्य सेवेचे उत्तम काम करणाऱ्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला

जागतिक आरोग्य संघटनेने केला लोकबिरादरी प्रकल्पाचा सन्मान
भामरागड : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील ४३ वर्षांपासून आरोग्य सेवेचे उत्तम काम करणाऱ्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला जागतिक आरोग्य संघटनेने पब्लिक हेल्थ कॅम्पेन अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे.
डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचे पुत्र डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा दिगंत आमटे यांनी शुक्रवारला नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, अनुप्रिया पटेल, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकेडम आदी मान्यवर उपस्थित होते.
२३ डिसेंबर १९७३ ला समाजसेवक बाबा आमटे यांनी भामरागड तालुक्यातील हेमलकसा या दुर्गम गावात एका गवताच्या झोपडीतून लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. तेव्हापासून बाबा आमटे यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी या प्रकल्पाद्वारे गोरगरीब आदिवासींच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. जवळपास ४३ वर्षांपासून आमटे दाम्पत्य जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त व मुलभूत सुविधांचा अभाव असलेल्या हेमलकसा येथे आदिवासींना आरोग्यविषयक सेवा देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून डॉ.दिगंत प्रकाश आमटे व डॉ. अनघा दिगंत आमटे हेही सेवाकार्यात रममाण झाले आहेत. २०१६ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आमटे दाम्पत्यास त्यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल डी.लीट. पदवी देऊन गौरव केला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही लोकबिरादरी प्रकल्पास सन्मानित केल्याने आमटे दाम्पत्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)