कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार
By Admin | Updated: September 11, 2015 01:48 IST2015-09-11T01:48:39+5:302015-09-11T01:48:39+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार
अर्ज करा : कामगार कल्याण मंडळाची योजना
गडचिरोली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणाऱ्या कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सर्वसाधारण, परदेशातील उच्च शिक्षण, क्रीडा व विशेष क्रीडा उपक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
कामगार कुटुंबातील इयत्ता ९ वी ते त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या व सात टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती विशेष शिष्यवृत्ती सहाय्य योजनेअंतर्गत मिळणार आहे. राज्य व राष्ट्रीयपातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना पाच हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील, असेही कामगार कल्याण मंडळाने म्हटले आहे.
इयत्ता १० वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक हजार, १२ वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दीड हजार, अभियांत्रिकी पदवी व पदवीका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अडीच हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. वरील सर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, वडिलांचे उत्पन्न, बोनाफाईट प्रमाणपत्र, राशनकार्ड झेरॉक्स आदींसह परीपूर्ण भरलेला अर्ज कामगार कल्याण केंद्र गोकुलनगर येथे सादर करावा.