आराखड्यानुसारच कामे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 02:23 IST2016-12-22T02:23:34+5:302016-12-22T02:23:34+5:30
नागरिक, तज्ज्ञ यांच्याकडून सूचना स्वीकारून संपूर्ण शहर व प्रत्येक वॉर्डाचा विकास आराखडा तयार केला जाईल.

आराखड्यानुसारच कामे होणार
खासदारांची माहिती : विरोधकांच्या आरोपात काहीच तथ्य नाही
गडचिरोली : नागरिक, तज्ज्ञ यांच्याकडून सूचना स्वीकारून संपूर्ण शहर व प्रत्येक वॉर्डाचा विकास आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून शहराचा नियोजनबद्ध विकास केला जाईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत भाजपच्या हातात एकहाती सत्ता दिली आहे. जनतेने जो पक्षावर विश्वास टाकला आहे, या विश्वासाला तडा जाणार, अशी कृती पक्षातर्फे व नगरसेवकांतर्फे कधीच केली जाणार नाही. लवकरच संपूर्ण शहराचा विकास आराखडा तयार केला जाईल. या विकास आराखड्यानुसारच शहरात विकास कामे केली जातील. केंद्र व राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ टक्केवारीसाठी कामे केली आहेत. या संपूर्ण कामांची चौकशी केली जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे शहराची सुमारे ३५ वर्ष सत्ता होती. मात्र या कालावधीत त्यांनी विकास केला नाही. युवाशक्ती आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी डांबरवर सिमेंट रोड व सिमेंट रोडवर डांबर टाकण्याचेच काम केले आहे. हा सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आला. त्यामुळे १८ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. मात्र पराभवाचे शल्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला पचविता आले नाही. त्यामुळे भाजपने सत्ता आणि पैशाच्या माध्यमातून प्रशासन व ईव्हीएम मशीनचा दुरूपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपामध्ये काहीच तथ्य नाही. विरोधकांच्या या आरोपांना भाजप तर सोडाच जनतासुद्धा भिक घालणार नाही.
शहराच्या विकासासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक कटिबद्ध आहेत, असे अभिवचन खा. अशोक नेते यांनी जनतेला दिले आहे.
पत्रकार परिषदेला आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा योगीता प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, गजानन येनगंधलवार, सुधाकर येनगंधलवार, डॉ. भारत खटी, नंदू काबरा, रेखा डोळस आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)