अनुदानाअभावी विहिरींचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:09+5:302021-06-21T04:24:09+5:30
आरमाेरी : शासनाच्या धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत आरमोरी व कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र, संबंधित ...

अनुदानाअभावी विहिरींचे काम रखडले
आरमाेरी : शासनाच्या धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत आरमोरी व कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र, संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
ब्लड बँकेअभावी रुग्णांची अडचण
सिरोंचा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दोन रक्तपेढ्या आहेत. याशिवाय अन्य ठिकाणी रक्तपेढ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे रक्ताची गरज भासलेल्या रुग्णाला दोन ठिकाणी भरती करावे लागते. सिराेंचा हा जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेला तालुका आहे.
पक्क्या रस्त्याअभावी ४० किमींची पायपीट
लाहेरी : बिनागुंडा परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखल तुडवत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व उपचारासाठी लाहेरी येथे यावे लागते. पक्का रस्ता नसल्याने अनेक नागरिक ३५ ते ४० किलोमीटर पायी चालत येतात. पावसाळ्यात या मार्गाने दुचाकी नेणे कठीण हाेते.
रेगुंठात फोर-जी सेवा देण्याची मागणी
सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने, ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे दूरसंचारचे टॉवर उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
वडधा-पाेर्ला मार्गावर अपघाताची शक्यता
आरमाेरी : तालुक्यातील वडधा-पाेर्ला बाेडधानजीक नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत पूरपरिस्थिती निर्माण हाेत असते. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत पाच-सहा वर्षांपूर्वी नवीन उंच पूल निर्माण केला. पूल बनविताना पुलाच्या बाजूला लाेखंडी पाईप व संरक्षण कठडे लावण्यात आले. मात्र, हे लाेखंडी पाईप गायब झाल्याचे दिसून येत आहे. या भागात अनेक ठिकाणच्या पुलांवर कठडेही नाहीत. परिणामी माेठा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मयालघाट गाव शासनदरबारी दुर्लक्षित
काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलायघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेंदिया- गडचिराेली जिल्ह्यांच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे. या गावात मूलभूत सुविधाही पाेहाेचल्या नाहीत.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
काेरची : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत शासनस्तरावरून अंमलबजावणी करण्यात आली नाही.
बॉयोमेट्रिक मशीन बंद; कर्मचारी बिनधास्त
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित रहावेत याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, सध्या त्या बंद आहेत.
मिरकलवासीयांना विजेची प्रतीक्षा
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र, वीज पाेहाेचली नाही.
बाजारातील गाळे भाड्याने देण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील आठवडा बाजारातील गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. हे गाळे दुकानदारांना दुकान टाकण्यासाठी किरायाने उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे. या दुकान गाळ्यांच्या माध्यमातून अनेक युवकांना राेजगारासाठी स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.
बहूतांश अनेक पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगर परिषदेने या मार्गावर पथदिवे लावले आहेत. मात्र, यातील बरेच पथदिवे सद्यस्थितीत बंद पडून आहेत.