काम अर्धवट मात्र आठ लाखांचे बिल काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:59 IST2016-04-26T00:59:19+5:302016-04-26T00:59:19+5:30
राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेंतर्गत शेती सिंचनासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी प्रशासकीय यंत्रणांना

काम अर्धवट मात्र आठ लाखांचे बिल काढले
एटापल्ली : राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेंतर्गत शेती सिंचनासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी प्रशासकीय यंत्रणांना प्राप्त होत असते. मात्र अनेक कामे अर्धवट ठेवून त्याचे लाखो रूपयांचे बील काढल्याचे प्रकार उजेडात येत आहेत. तत्कालीन एटापल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १५ लाख रूपयांचे साठवणूक बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर काम अर्धवट असतानाही सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाचे तब्बल आठ लाखांचे बिल काढले आहे. निधीची वासलात लावण्याचा प्रकार सुरू आहे.
सिंचाई उपविभाग अहेरी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने सन २०१२-१३ या वर्षात एटापल्ली येथे ग्रामपंचायत असताना संत चावरा इंग्लिश स्कूल नजीकच्या डुम्मी नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साठवण बंधाऱ्यांचे काम मंजूर करण्यात आले. या कामाची अंदाजपत्रकानुसार एकूण किंमत १५ लाख रूपये आहे. सदर बंधाऱ्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र दोन वर्ष उलटूनही या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले नाही. या कामावर जेसीबी लावून केवळ खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर बेडस्तरापर्यंत हे काम करण्यात आले. त्यानंतर या बंधाऱ्याचे कामच झाले नाही. मात्र असे असतानाही तब्बल आठ रूपयांचे देयक काढण्यात आल्यामुळे सदर कामाचा मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
२४ जुलै २०१५ रोजी एटापल्ली नगर पंचायत अंतर्गत सिंचाई उपविभाग अहेरी जि.प. गडचिरोली मार्फत एटापल्ली येथील डुम्मी नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साठवणुक बंधाऱ्याचे काम घेण्यात आले. मात्र या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात काम झाले आहे. या कामापोटी श्रीराम कृष्ण ट्रेडिंग कंपनीच्या नावे ९ लाख ६० हजार व १ लाख २८ हजार असे दोन धनादेश काढण्यात आले. सोनटक्के ट्रान्सपोर्ट यांच्या नावे १ लाख ५० हजार, २ लाख १५ हजार, ६५ हजार व त्यानंतर ९७ हजार ६०० रूपये असे एकूण चार धनादेश काढण्यात आले. विशेष म्हणजे तब्बल ७ लाख ५१ हजार ६०० रूपयांचे चार धनादेश एकाच दिवशी २४ जुलै २०१५ रोजी करण्यात आले. मात्र सदर बिल काढताना कामाची पाहणी, कामाची गुणवत्ता, झालेल्या कामापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा व विविध तांत्रिक बाजू बारकाईने तपासण्यात आल्या नाही. असे प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर दिसून आले. त्यामुळे या बंधाऱ्याच्या कामात प्रशासकीय यंत्रणेने प्रचंड घोळ केला असल्याचे दिसून येत आहे.
एटापल्ली तालुका नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असल्याने अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करीत नाही. त्यामुळे काम न करताच तसेच अर्धवट कामाचे कार्यालयात बसून बिल काढले जात आहे.
तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षात झालेल्या अनेक विकासकामांचे प्रत्यक्ष पाहणी केल्यास अनेक बाबी उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. अत्यल्प प्रमाणात झालेल्या डुम्मी नाल्यावरील साठवण बंधाऱ्याच्या कामाचे आठ लाख रूपयांचे बिल काढण्यात आले. यावरून सिंचाई विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रा.पं.च्या कामाचे बिल न.पं.ने काढले : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१२-१३ मध्ये डुम्मी नाल्यावरील साठवण बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी एटापल्ली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या बंधाऱ्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले. त्यानंतर नगर पंचायत अस्तित्वात आली. बीडीओंकडे नगर पंचायतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ग्रा.पं.ने अर्धवट ठेवलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. शिवाय ग्रा.पं.च्या अर्धवट कामाची तपासणी करून त्या प्रमाणात कामाचे बिल काढणे नियमानुसार आवश्यक होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या साऱ्या बाबीला बगल देऊन बंधाऱ्याच्या अर्धवट कामाचे आठ लाख रूपयांचे बिल काढले.
कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) आपल्यापर्यंत आल्यानंतरच सदर साठवण बंधाऱ्यांच्या कामाचे बिल काढण्यात आले. सदर काम झाले किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अभियंत्याची आहे.
- संपत खलाटे, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी नगर पंचायत एटापल्ली
मला किती पगार आहे, सांगा? आम्हाला पगार कशाला मिळतो. मी प्रत्यक्ष सातवेळा साठवण बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतरच या कामाचे बिल काढले. मी आपल्यासोबत अधिनस्त अभियंत्याला पाठवितो. आपण काम बघून घ्या.
- पी. एम. इंगोले, उपविभागीय अभियंता, सिंचाई उपविभाग अहेरी