जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम

By Admin | Updated: November 13, 2015 01:21 IST2015-11-13T01:21:17+5:302015-11-13T01:21:17+5:30

तेलंगणा व महाराष्ट्रातील अहेरी तालुक्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली नदीवरील पूल मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर राहणार आहे.

Work of Wangepally Bridge near Aheri will be started in January | जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम

जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम

राजवाड्यात स्वागत : तेलंगणाच्या आमदारांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
अहेरी : तेलंगणा व महाराष्ट्रातील अहेरी तालुक्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली नदीवरील पूल मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर राहणार आहे. या पुलामुळे महाराष्ट्र व तेलंगणा राज्य जोडले जाणार असून येत्या जानेवारी महिन्यात या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल, अशी माहिती तेलंगणाच्या कागजनगरचे आमदार कोनप्पा यांनी दिली.
अहेरी येथील रूक्मिणी महालात गुरूवारी आमदार कोनप्पा यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेतली व त्यांच्याशी प्रश्नासह विविध मुद्यांवर चर्चा केली. मागील ३०-४० वर्षांपासून वांगेपल्ली पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याला अहेरी तालुक्यातून जोडणारा हा पूल आता मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर येणार आहे.
१८० किमी अंतराचा हा परिघ केवळ ५० किमीवर येणार असल्याने तेलंगणा व महाराष्ट्रातील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी तेलंगणा सरकारने पुढाकार घेतला असून ९५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. व याचे कामही मोठ्या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याचे कोनप्पा यांनी नामदार आत्राम यांना सांगितले. या कामाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी माहिती नामदार अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. या भूमीपूजन कार्यक्रमाच्या नियोजनावरही दोघांत चर्चा झाली.
या पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खासदार अशोक नेते व गडचिरोली जिल्ह्यातील आमदार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहितीही आमदार कोनप्पा यांनी दिली.
अहेरी भेटीदरम्यान आमदार कोनप्पा यांनी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Work of Wangepally Bridge near Aheri will be started in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.