कासवीतील रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणार
By Admin | Updated: September 20, 2016 00:55 IST2016-09-20T00:55:00+5:302016-09-20T00:55:00+5:30
देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांनी थेट कासवी गावाला भेट देऊन रखडलेल्या...

कासवीतील रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणार
एसडीओंकडून चौकशी : लोकमतच्या वृत्ताची दखल
जोगीसाखरा : देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांनी थेट कासवी गावाला भेट देऊन रखडलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याची चौकशी केल्यानंतर या रस्त्याचे बांधकाम पुन्हा तत्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारांना त्यांनी दिले. यामुळे आता कासवीतील रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे.
आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील कासवी येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम मागील २० दिवसांपासून बंद होते. त्यामुळे रस्त्यावरील गिट्टीच्या ढिगांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भातील वृत्त छायाचित्रासह लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी कासवी गावाला भेट देऊन रस्ता कामाची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल अधिकाऱ्यांची चमू होती. कासवी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. सदर समस्येची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी रखडलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, असे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले, असल्याचे कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एसडीओंनी थेट गावात येऊन रस्त्याची समस्या जाणून घेतली. आता येथील रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने कासवीवासीयांनी लोकमतचे आभार मानले. (वार्ताहर)