जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी कार्य करा
By Admin | Updated: December 16, 2014 22:52 IST2014-12-16T22:52:55+5:302014-12-16T22:52:55+5:30
आदिवासी, मागास नक्षलप्रभावीत अशी संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगुण भरीव कार्य करावे,

जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी कार्य करा
गडचिरोली : आदिवासी, मागास नक्षलप्रभावीत अशी संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगुण भरीव कार्य करावे, असे आवाहन अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले.
जिल्हा पोलीस विभाग व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दर्शन सहलीच्या कार्यक्रमाचा आज मंगळवारला जिल्हा मुख्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, गृह अधीक्षक डी. बी. इलमकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. कन्ना मडावी यांनी सहलीचा आनंद घेऊन आलेल्या आदिवासी मुला- मुलींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, स्वत:चे व जिल्ह्याचे चित्र जिल्ह्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना बदलवायचे आहे. जिल्हा बाहेरून कोणीतरी मोठा पुढारी वा अधिकारी येऊन जिल्ह्याचे मागासलेपण पूर्णत: दूर करू शकणार नाही. महाराष्ट्र दर्शन सहलीतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून जिल्हा विकासास हातभार लावावा, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला पाहिजे, असे भव्यदिव्य कार्य करा, असे सांगितले. संचालन जनसंपर्क अधिकारी प्रवीण निंबाळकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)