विद्युत उपकेंद्राचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:58 IST2019-03-31T23:57:40+5:302019-03-31T23:58:01+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली.

विद्युत उपकेंद्राचे काम संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली. १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही काम पूर्ण न झाल्याने परिसरातील वीज समस्या केव्हा सुटेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.
दीनदयाल उपाध्याय योजनेतून अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून काम सुरू झाले. त्यानंतर ३१ मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा करार झाला. वीज उपकेंद्र निर्मितीचे काम हैदराबाद येथील एका कंपनीला देण्यात आला होता. मात्र जवळपास १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या केवळ ५० टक्केच काम झाल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते. विशेष म्हणजे ३३ के व्ही उपकेंद्र निर्मितीचे काम संथगतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली माल, अडपल्ली चेक, सुभाषग्राम व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या निर्माण होते.
विशेषत: पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात विजेचा लपंडाव वाढतो. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो सुरळीत होत नाही. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना पंखे, कुलर व एसी लावावी लागते. परंतु याचवेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो, तर कधी वीज पुरवठा गायब असतो. अशावेळी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा जंगलातून करण्यात आला आहे. पावसाळ्यात वादळ, वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडत असल्याने पुरवठा खंडित होतो. जवळपास चार ते पाच दिवस तो सुरळीत होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण केले जात आहे. परंतु सदर उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने या भागातील वीज समस्या सुटण्यास नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.