चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू

By Admin | Updated: March 22, 2015 00:23 IST2015-03-22T00:23:33+5:302015-03-22T00:23:33+5:30

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे.

The work of the Chichadoh project is going on | चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू

चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू

गडचिरोली : वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी ४५० कोटी रूपये लागणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी २०१४-१५ या वर्षात ५७ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली होती.
मंजुरी मिळाल्यानंतर चिचडोह सिंचन प्रकल्पाची प्रस्तावित किमत २८२.७३ कोटी होती. मात्र सदर किमत वाढून आता ४५० कोटी झाली आहे. मार्च २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाच्या कामावर १६२.१६ कोटी रूपयाचा निधी खर्च झाला आहे. १ एप्रिल २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाची उर्वरित किमत २८७.४४ कोटी रूपये आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ६२.५२ दक्षलक्ष घनमिटर आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून १०३.४४ दशलक्ष घनमिटर पाण्याचा वापर होणार आहे. या सिंचन प्रकल्पातून ६२० हेक्टर क्षेत्राचा वापर होणार आहे.
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून काम पूर्ण करण्याची जबाबदारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यावर आहे. विहित कालावधीत चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या हेतुने जलसंपदा विभागाने हालचाली वाढविल्या आहेत. या दृष्टीने संबंधित कंत्राटदारास तसे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पाच्या कामामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण झाला आहे. सदर प्रकल्पाचे काम जोमात सुरू असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पल्लवीत झाल्या आहे.

असे आहे निधी खर्चाचे नियोजन
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाची सध्याची किंमत ४५० कोटी रूपये आहे. सन २०१४-१५ या वर्षात या प्रकल्पाच्या कामावर ५७ कोटी रूपये खर्च करावयाचे असून सन २०१५-१६ या वर्षात १०० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. २०१६-१७ या वर्षात १०० कोटी रूपयांचा खर्च होणार असून २०१७-१८ मध्ये ३०.८४ कोटी रूपये खर्चाचे नियोजन आहे.

जून २०१७ पर्यंत काम पूर्ण होणार
वैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सन २०१७ च्या जून अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आराखडा तयार केला आहे.
चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर या सिंचन प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी मोठा लाभ होणार आहे. परिणामी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुष्काळातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

Web Title: The work of the Chichadoh project is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.