जागेमुळे लांबणार चामोर्शीच्या क्रीडा संकुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:04 IST2018-02-12T00:03:24+5:302018-02-12T00:04:03+5:30

प्रत्येक तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला जिल्ह्यात विविध कारणांमुळे अजूनही गती मिळालेली नाही.

The work of Chamorshi's sports complex will be delayed by awakening | जागेमुळे लांबणार चामोर्शीच्या क्रीडा संकुलाचे काम

जागेमुळे लांबणार चामोर्शीच्या क्रीडा संकुलाचे काम

ठळक मुद्देखोलगट जागेचे हस्तांतरण : फेब्रुवारीअखेर तयार होणार बांधकामाचे अंदाजपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रत्येक तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला जिल्ह्यात विविध कारणांमुळे अजूनही गती मिळालेली नाही. चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी महसूल विभागाने अडीच हेक्टर जागा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केली आहे. मात्र ही जागा रस्त्याच्या पातळीपेक्षा खोलगट भागात असल्यामुळे त्या जागेत मातीची भरण द्यावी लागणार आहे. तो खर्च पकडून संकुलाच्या इतर कामांसाठी किती खर्च येऊ शकतो याचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे.
या संकुलाच्या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी तयार आहे. मात्र क्रीडांगणात मातीची भरण देण्यासाठी अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचे अंदाजपत्रक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या त्याचे अंदाजपत्रक बनविणे सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत अंदाजपत्रक तयार होईल. त्यानंतर क्रीडा संकुल बांधकामासाठी त्या अंदाजपत्रकाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेतली जाईल. त्यानंतरच या कामासाठी निविदा उघडली जाईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सध्या क्रीडा संकुलाअभावी या तालुक्यातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंना खेळांच्या सरावासाठी योग्य स्थान व मार्गदर्शन मिळेनासे झाले आहे. परिणामी क्षमता व प्रतिभा असतानाही ते खेळाडू मागे पडत आहेत. त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला योग्य संधी देण्यासाठी तातडीने हे काम पूर्ण करावे आणि आमदारांनी गांभिर्याने त्यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा चामोर्शी तालुक्यातील क्रीडा प्रेमी व नागरिक करीत आहेत.
आमदारांचे दुर्लक्ष
तालुका क्रीडा संकुलाचे हे काम निधी तयार असतानाही अनेक वर्षांपासून रेंगाळत पडले आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.देवराव होळी यांनी वेळीच लक्ष घातले असते तर या संकुलाचे काम आतापर्यंत सुरूही झाले असते. पण या घडीला जेमतेम जागेचे हस्तांतरण झाले आहे. आता तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळविण्याच्या प्रक्रियेत आणखी काही महिने जातील. त्यामुळे निविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास पुढील आर्थिक वर्ष उजाडणार आहे.
अतिक्रमणधारक ठरत आहेत वरचढ?
प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले होते. ते अतिक्रमण आता हटविले असले तरी त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण सुरू झाले आहे. संकुल उभारणीच्या कामाला जितका उशिर होईल तितके अतिक्रमणधारक आपले पाय पसरण्याची शक्यता आहे. स्वत: आमदारांच्या निगरानीखालील समिती क्रीडा संकुलाच्या बांधकामाची जबाबदारी सांभाळत असताना कोणी अतिक्रमण करण्याची हिंमत करतात कसे? यावरून ते समितीपेक्षा वरचढ झाले की काय? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Web Title: The work of Chamorshi's sports complex will be delayed by awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा