दारूविक्रेत्यांच्या विरोधात महिलांनी कसली कंबर
By Admin | Updated: February 10, 2017 02:16 IST2017-02-10T02:16:25+5:302017-02-10T02:16:25+5:30
गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात दारूचा अवैध व्यापार करून कोट्यधीश झालेले लोक आता राजकारणात उतरले आहेत.

दारूविक्रेत्यांच्या विरोधात महिलांनी कसली कंबर
गावागावात लागले फलक : दारूविक्रेते व कुटुंबीयांना निवडून देऊ नका
गडचिरोली : गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात दारूचा अवैध व्यापार करून कोट्यधीश झालेले लोक आता राजकारणात उतरले आहेत. अनेक दारूविक्रेत्यांनी त्यांच्या बायकांना मैदानात उतरविल्याने नारी शक्ती या दारूविक्रेत्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सरसावल्या आहेत.
विविध गावात अवैध दारूविक्रीच्या व्यापाऱ्यात असलेल्या उमेदवारांच्या विरोधात फलक लावून जनजागृती केली जात आहे. चामोर्शी, गडचिरोली तालुक्यातील काही मतदार संघासह जिल्ह्याच्या विविध भागत फलक झळकू लागले आहे. या फलकावर ‘माता भगिनींनो हात जोडून विनंती आहे, जो उमेदवार तुमच्या नवऱ्याला, मुलाला व भावाला दारू पाजतोय, त्या उमेदवाराला चुकुनही मतदान करू नका, तो गावाच्या विकासाचे नियोजन नाही, तर तुमचे लेकरबाळ उघड्यावर पाडण्याचे नियोजन करतोय’, असे फलक झळकू लागले आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. अवैध दारूच्या व्यवसायात असलेले लोक व त्यांचे कुटुंबीय यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय लोकांनाही या महिलांनी जाब विचारण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे. तसेच सोशल मीडियावरूनही यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
लवकरच या महिला ज्या मतदार संघात असे उमेदवार उभे आहेत, तेथे जाऊनही सभांद्वारे येत्या काळात जनजागृती करणार आहे. लोकांना व मतदारांना हात जोडून विनंती करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दारूबंदी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी दिली. महिलांच्या या पवित्र्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणणार आहे.