जन-धन योजनेत महिलांची आघाडी

By Admin | Updated: December 6, 2014 22:48 IST2014-12-06T22:48:35+5:302014-12-06T22:48:35+5:30

प्रत्येक कुटुंबाचे किमान एक बँक खाते असावे यासाठी केंद्र शासनाने जन-धन योजना सुरू केली असून या योजनेला जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी

Women's Leadership in Jan-Dhan Yojana | जन-धन योजनेत महिलांची आघाडी

जन-धन योजनेत महिलांची आघाडी

गडचिरोली : प्रत्येक कुटुंबाचे किमान एक बँक खाते असावे यासाठी केंद्र शासनाने जन-धन योजना सुरू केली असून या योजनेला जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जन-धन योजनेंतर्गत सुमारे ३४ हजार ४०५ बँक खाते उघडण्यात आले असून यापैकी २६ हजार २८ खाते महिलांचे आहेत. तर पुरूषांचे केवळ ८ हजार ३७७ बँक खाते उघडण्यात आले आहेत.
आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता व गतिमानता निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. मात्र देशातील ४० टक्के कुटुंबाकडे बँक खातेच नसल्याचे दिसून आल्यानंतर सहा महिन्यापूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने बँक खाते उघडण्यासाठी जन-धन योजना सुरू केली. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. या योजनेंतर्गत प्रत्येक राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बँक खाते उघडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक बँकेला गाव व वार्डांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जिल्ह्यातील १२२ गावांमधील नागरिकांचे खाते उघडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार सहकारी बँकेने प्रत्येक गावाचा व कुटुंबाचा सर्व्हे केला. ज्या कुटुंबाकडे बँक खाते नाही. अशा कुटुंबातील महिलांचे खाते उघडण्यास विशेष प्राधान्य दिले. त्याचबरोबर कुटुंबात खाते असले तरी महिलांना बचतीची सवय लागावी यासाठी महिलांचे खाते उघडण्यावर भर देण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात एकूण ५४ शाखा असून त्यामध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. बँक खाते काढण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रत्येक बँक कर्मचाऱ्याला महिन्याचे २५ नवीन खाते काढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियोजनबध्द कार्यक्रमामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे ३४ हजार ४०५ खाते उघडणे शक्य झाले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, महिलांचे २६ हजार २८ खाते उघडण्यात आले आहेत. जन-धन योजनेंतर्गत बँक खाते शून्य बचतीवर उघडता येत असले तरी महिलांनी या बँक खात्यांमध्ये सुमारे २ कोटी ६९ लाख ६० हजार ५८९ रूपये जमा केले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते इतर राष्ट्रीय बँकांच्या खात्याप्रमाणेच कनेक्टिव्हीटी मिळाली आहे. त्यामुळे या बँकेचे व्यवहार आता राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच झाले आहेत. त्यामुळे शासनाचे मिळणारे अनुदान या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहे. त्यामुळे जन-धन योजनेंतर्गत बँक खाते उघडलेल्या व्यक्तीला राष्ट्रीयकृत बँकांचे खाते उघडण्याची गरज नाही.
सद्यस्थितीत एकूण ३४ हजार ४०५ खाते उघडण्यात आले असले तरी ३१ मार्च २०१५ पर्यंत सुमारे ५० हजार बँक खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तीन महिन्यात बँक खाते उघडण्याचे प्रमाण लक्षात घेतले तर हे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Women's Leadership in Jan-Dhan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.