महिलांचे आमरण उपोषण
By Admin | Updated: May 3, 2016 01:47 IST2016-05-03T01:47:11+5:302016-05-03T01:47:11+5:30
भामरागड तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारू बंदी करण्यात यावी, ब्राह्मणपल्ली, भामरागड, कोठी येथे जल उपसा

महिलांचे आमरण उपोषण
भामरागड : भामरागड तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारू बंदी करण्यात यावी, ब्राह्मणपल्ली, भामरागड, कोठी येथे जल उपसा केंद्र सुरू करावे, भामरागडला पर्यटन क्षेत्र घोषीत करावे, आदीसह विविध मागण्यांना घेऊन भामरागडच्या नगर पंचायत कार्यालयासमोर महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान भामरागडचे नायब तहसीलदार डोंगरे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सदर मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविल्या आहे. त्याचे निराकरण होईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी सदर आमरण उपोषण दोन तासातच मागे घेतले.
आमरण उपोषणाला भारती इष्टाम, सपणा रामटेके, रमाबाई टेंभुर्णे, शेला यम्पलवार, दिनेश मडावी आदी बेसले होते. यापूर्वी महिलांच्या शिष्टमंडळाने भामरागडच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन २ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान नायब तहसीलदार स्वामी डोंगरे यांनी उपोषणकर्त्या महिलांना लिंबूपाणी पाजून उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बनकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद महागळे, नैताम, न.प. मुख्याधिकारी परसे, अनुप घाटे आदी उपस्थित होते. भामरागडच्या या महिलांनी दारू विक्रीच्या प्रश्नांवर यापूर्वीही आंदोलने केली होती. (तालुका प्रतिनिधी)