दारू विक्रेत्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाला महिला देणार धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 01:32 IST2017-02-05T01:32:42+5:302017-02-05T01:32:42+5:30
गडचिरोली जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून दारू तस्कराच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहे.

दारू विक्रेत्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाला महिला देणार धडा
नेत्यांना जाब विचारणार : राजकीय पक्षांविषयी प्रचंड असंतोष
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून दारू तस्कराच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहे. यात काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहे. जिल्ह्यात दारूबंदीसाठी मुक्तीपथ सारखे अभियान सुरू असताना व गावागावात व्यसनमुक्तीच्या कामासाठी तंटामुक्त समित्या व महिला समित्या सक्रीय असताना राजकीय पक्षांकडून महिलांच्या प्रवर्गात दारू विक्रेत्याच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात घडला आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्या व व्यसनमुक्तीसाठी काम करणारे लोक प्रचंड नाराज असून या संदर्भात लवकरच जाहीर जनजागृती मोहीम सदर पक्षांच्या विरूध्द राबविणार येणार असल्याची माहिती व्यसनमुक्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकमतला दिली आहे.
पोलीस प्रशासनाने चामोर्शी येथील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याविरूध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. मात्र त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली नाही. त्याच्या कुटुंबियांनाच राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना व्यसनमुक्तीच्या व दारूबंदीच्या कार्यक्रमाशी काहीही देणघेण नाही, असा संदेशच मिळाला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात कठोर कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)