ठाण्यावर महिला धडकल्या
By Admin | Updated: February 27, 2015 01:19 IST2015-02-27T01:19:48+5:302015-02-27T01:19:48+5:30
स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ...

ठाण्यावर महिला धडकल्या
देसाईगंज : स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने बुधवारी रात्री ९ वाजता दोन हजार महिला, पुरूषांचा मोर्चा देसाईगंज पोलीस ठाण्यावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्त्व नगराध्यक्ष श्याम उईके, विर्शी वाडार्तील नगरसेवक मनोज खोब्रागडे, आबेद अली यांनी केले. वार्डातील दारूबंदीबाबत पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केल्या नंतर सकारात्मक आश्वासन मिळाल्यावर महिला व नागरिक माघारी फिरले.
सध्या ब्रम्हपुरी मुख्यमार्गावरील कब्रस्तान, बायपास चौक दारूविक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे. शहरातील हा भाग नवीन वाईन स्टेशनच्या रूपात समोर येत आहे. ब्रम्हपुरी मार्गावरील रहदारीमुळे या वाईन हबवर नेहमीच गर्दी पाहायला मिळत आहे. दारूविक्री सोबत या ठिकाणी सट्टापट्टीही घेतली जाते. यामुळे विर्शी वार्डात अशांतता पसरत चालली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विर्शी वासीयांनी चौकातील व वाडार्तील दारू व सट्टा तत्काळ बंद झाला पाहिजे यासाठी थेट पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढला. या मोर्चात गावातील शेकडो महिला, तरूणांनी सहभाग घेतला. पोलिसांना दारूविक्रीची कल्पना असून देखील पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची कारवाई करित नसल्याचे महिलांनी यावेळी बोलून दाखविले. पोलीस निरीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत गावकऱ्यांनी दारूविक्रीबाबत पोलीस प्रशासनाला सूचना कराव्यात, कुठे दारूविक्री होत आहे त्याबाबत माहिती दिल्यास सबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांमध्ये दारूबंदीबाबतच्या जागृतीमुळे आता तरी पोलीस प्रशासन दारूबंदी करण्यासाठी समोर येईल काय, असा प्रश्न महिलांनी यावेळी उपस्थित केला.
मागील वर्षी स्थानिक जुनी वडसा वाडार्तील नागरिकांनी देखील वार्डात दारूबंदी केली. तरीही वार्डात अजूनही छुप्यामागाने दारूविक्री सुरूच आहे. पोलीस प्रशासनाच्या नाममात्र कारवाईमुळे शहरातील दारूविक्रीला उधाण आले आहे. दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूबंदीकरिता नागरिकांना लढा द्यावा लागत आहे. जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
देसाईगंजच्या ग्रामीण भागातही दारूविक्री जोरात
देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत विविध वार्डांमध्ये दारूविक्री जोरात सुरू असली तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरेगाव येथे काही दिवसांपूर्वी गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरम अभावी ती तहकूब झाली. आता २८ तारखेला सभा घेऊन दारूबंदीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन मात्र दारूबंदी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.