दुर्गम भागातील महिलांची बचत २८ कोटींवर पोहोचली
By Admin | Updated: March 8, 2017 02:13 IST2017-03-08T02:13:06+5:302017-03-08T02:13:06+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या ‘महिला समृध्दी बचत ठेव व कर्ज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार महिलांनी बचत खाते उघडले

दुर्गम भागातील महिलांची बचत २८ कोटींवर पोहोचली
६७ हजार महिलांनी उघडले बँक खाते : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महिला समृध्दी; स्वावलंबी बनण्याकडे वाटचाल
दिगांबर जवादे गडचिरोली
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या ‘महिला समृध्दी बचत ठेव व कर्ज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार महिलांनी बचत खाते उघडले असून या खात्यांवर सुमारे २८ कोटी रूपयांची बचत झाली आहे. अशिक्षीत म्हणून हिनविल्या जाणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांनाही बचतीचे महत्त्व कळायला लागले आहे. हे यावरून दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. या भागातील जनतेला विशेष करून महिलांना बचतीची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सप्टेंबर २०१५ पासून महिला समृध्दी बचत ठेव कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे वैयक्तिक बचत खाते उघडण्यास प्राधान्य देण्यात आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन खाते उघडण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. सुरूवातीला टाळाटाळ करणाऱ्या महिलांनी खाते उघडण्यास सुरूवात केली. बँक खात्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर महिलांनीच गावात प्रचार करून इतर महिलांना बँक खाते काढण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील सुमारे ६७ हजार महिलांनी खाते उघडले आहेत. त्यांच्या खात्यावर २८ कोटी रूपयांची बचत जमा झाली आहे. हळूहळू बचतीचे महत्त्व या महिलांना कळत चालले असल्याने बचत खात्यावरील बचतीच्या आकड्यात महिन्याला एक कोटी रूपयांची भर पडली आहे. यातील बहुतांश महिलांना बँकेच्या वतीने चेकबूक, एटीएमचे वितरण केले आहे. त्यामुळे या महिला कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली आहे.