आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख
By गेापाल लाजुरकर | Updated: April 30, 2023 14:16 IST2023-04-30T14:15:50+5:302023-04-30T14:16:07+5:30
हाैसी कलाकार डाॅ. बिटपल्लीवार यांनी साकारले व्यक्तिचित्र

आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील वनसंपदा, नद्या, डाेंगरदऱ्या व येथील नैसर्गिक साैंदर्य मनाला माेहीत करते, तर येथील जीवनशैली, रीतीरिवाज व परंपरा आपले वेगळेपण राखून संशोधनासाठी अभ्यासकांना खुणावते. येथील जीवनशैलीचा कुणी अभ्यास करतात तर कुणी जलरंगात ते रेखाटतात. भामरागड तालुक्याच्या आरेवाडा येथील एका माडिया जमातीच्या महिलेचे व्यक्तिचित्र थेट इटलीच्या चित्र प्रदर्शनात पोहोचले. प्रदर्शनात माडिया महिलांचा पेहराव व वेशभूषा झळकली. हे चित्र रेखाटले हाैसी कलाकार वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बिटपल्लीवार यांनी.
इटली देशातील बाेलेग्नाे शहरात मागील २४ एप्रिलपासून सात दिवसीय ‘फेब्रियाने ॲक्वारेल्लाे- २०२३ वॉटरकलर’ चित्र प्रदर्शन सुरू आहे. जगभरातील प्रसिद्ध वॉटर कलर पेंटरच्या पेंटिंग येथे कलाप्रेमी व प्रेक्षकांसाठी परिक्षणासाठी ठेवल्या आहेत. कला रसिकांचासुद्धा या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भारतातील चारही झोनमधून निवडक वॉटर कलर पेंटिंग समाविष्ट झाल्या आहेत. वेस्ट झोनमधून पुण्याचे कॅप्टन प्रफुल हुडेकर व डॉ. माया भालेराव यांच्या नेतृत्वात अनेक कलावंतांचे निसर्ग व व्यक्तिचित्र सहभागी केले आहेत.
माडिया संस्कृतीचा पेहराव आंतरराष्टीयस्तरावर
गडचिरोली तालुक्याच्या जेप्रा प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बिटपल्लीवार यांनी माडिया जमातीतील महिलेचे जलरंगावर रेखाटलेले व्यक्तिचित्र सुद्धा आहे. विशेष म्हणजे, हे चित्र भामरागड तालुक्याच्या आरेवाडा येथील वृद्ध महिलेचे आहे. हे चित्र साधेच आहे; पण त्यातून त्या पिढीचा पेहराव व वेशभूषा कोणती हे प्रदर्शित करते. माडिया जमातीतील एकूणच वेशभूषा व पेहरावाचे प्रतिनिधित्व हे चित्र करते. ह्या महिलेच्या चित्राच्या माध्यमातून गडचिराेली जिल्ह्यातील माडिया संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली.
चित्रात विशेष काय ?
डॉ. विनोद बिटपल्लीवार यांनी आरेवाडा येथे हे व्यक्तिचित्र प्रत्यक्ष रेखाटले. वृद्धत्वाकडे कललेली माडिया जमातीतील ह्या महिलेच्या चेहऱ्यावर व हातापायावर गोंदण आहे. डोक्यावर पागा म्हणजे कापडी वस्त्र, कानात किवलांग (बिरीचा प्रकार) नाकात बंगार (नथ) गळ्यात सुता (दागिन्याचा प्रकार) अंगावर संदरा म्हणजेच साध्या साडीसारखे वस्त्र आहे. त्यांची ही पारंपरिक वेशभूषा व पेहराव आहे. दागिने व वस्त्रांची ही माडिया गोंडी भाषेतील नावे आहेत.