महिला रूग्णांशी धक्काबुक्की
By Admin | Updated: November 16, 2014 22:50 IST2014-11-16T22:50:01+5:302014-11-16T22:50:01+5:30
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या.

महिला रूग्णांशी धक्काबुक्की
अहेरी : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या. शुक्रवारला या महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शनिवारी व रविवारी या महिला रूग्णांकडे वॉर्डात एकही डॉक्टर व परिचारिका तपासणीसाठी फिरकल्या नाही. दरम्यान शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बचत गटाच्या महिला भोजन घेऊन वॉर्डात आल्या. भोजनावरून महिला रूग्ण व बचत गटांच्या महिलांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आज महिला रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी भोजनावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती रूग्णांचे नातेवाईक नामी मागम यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बेबी नामी मागम (२५), इमला श्यामराव झाडे (२७) रा. पेंचकलापेठा व देवलमारीच्या काही महिला परिचारिकेच्या माध्यमातून शस्त्रक्रियेकरिता अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती झाल्या. तुमची पूर्ण देखभाल करून योग्य सेवा व भोजन देऊ अशी आशा संबंधीत परिचारिकेने या महिलांना दिली होती. मात्र प्रत्यक्ष शस्त्रक्रियेनंतर आरोग्य सेवा व भोजनाबाबत गैरसोयग झाल्याची माहिती रूग्णांनी दिली.
शनिवारी एकही डॉक्टर व परिचारिका वॉर्डात फिरकले नसल्याने या महिला रूग्णांची दैनंदिन तपासणी झाली नाही. शनिवारी सायंकाळी बचत गटाच्याय महिला भोजन वाटपाकरिता वॉर्डात आल्या. या महिलांनी प्रत्येक रूग्ण एका नातेवाईकाला भोजनाचे ताट दिले. मात्र नातेवाईकांनी काही रूग्णांचे भोजनाचे डब्बे भरून आणल्याने सदर डब्ब्यातील भोजन संबंधीत महिला रूग्णांना दिले. सदर बाब भोजन वाटप करणाऱ्या महिलांना पटली नाही. या महिलांनी ज्यांच्यासाठी डब्बे आले त्यांचे भोजनाचे ताट हिसकावून घेतले. दरम्यान बचत गटाच्या महिला व वॉर्डातील महिला रूग्ण यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान एक महिला रूग्ण धक्काबुक्कीमुळे बेडकडे पडली, अशीही माहिती रूग्णांचे नातेवाईक नामी मागम यांनी दिली आहे.
सदर प्रकार घडल्यामुळे या वॉर्डातील रूग्ण व नातेवाईकांनी रूग्णालयातील भोजन उपजिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत घेणार नसल्याचे ठाम सांगून रूग्णालयातील बचत गटांकडील भोजनावर बहिष्कार टाकला. यासंदर्भात रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, रूग्णालयात घडलेल्या सदर प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)