गडचिरोलीत घातपाताचा डाव उधळला; चकमकीत प्लाटून कमांडरसह महिला नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 20:03 IST2021-05-13T19:41:25+5:302021-05-13T20:03:32+5:30

Gadchiroli news नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलिसांचे सी-६० पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून १५ चा कमांडर राजा ऊर्फ रामसाई नोहरू मडावी आणि एक महिला नक्षलवादी ठार झाले.

A woman Naxalite along with a platoon commander was killed in an encounter in Gadchiroli | गडचिरोलीत घातपाताचा डाव उधळला; चकमकीत प्लाटून कमांडरसह महिला नक्षलवादी ठार

गडचिरोलीत घातपाताचा डाव उधळला; चकमकीत प्लाटून कमांडरसह महिला नक्षलवादी ठार

ठळक मुद्देदोघांवर होते १४ लाखांचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलिसांचे सी-६० पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून १५ चा कमांडर राजा ऊर्फ रामसाई नोहरू मडावी आणि एक महिला नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून दोघांवर मिळून १४ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते.

यासंदर्भात डीआयजी संदीप पाटील यांच्यासह एएसपी (ऑपरेशन) मनीष कलवानिया यांनी संध्याकाळी सविस्तर माहिती दिली. धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शोधमोहीम राबवत होते. दरम्यान, सकाळी ६ ते ६.३० वाजतादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात दोन नक्षल्यांचा खात्मा झाला.

घटनास्थळावरून एसएलआर रायफल, ८ एमएम रायफल, कुकर बॉम्ब व आईडी अशा स्फोटक साहित्यांसह नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाले असण्याची शक्यता या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे एएसपी समीर शेख यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या कारवाईत नागपूरमधून आलेल्या स्पेशल ॲक्शन ग्रुप (सॅग)च्या ३ तुकड्यांनीही सहभाग घेतला. पत्रपरिषदेला सॅगचे एसपी डॉ. निलाभ रोहण, एएसपी सोमय मुंढे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेलिकॉप्टरने आणले मृतदेह

दोघांचेही मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणून ओळख पटविण्यात आली. त्यातील मृत नक्षल कमांडर राजा मडावी (वय ३३, रा. मोरचुल, ता. धानोरा) याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे ४४ गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्यावर १२ लाखांचे बक्षीस होते. तसेच रनिता ऊर्फ पुनिता चिपळुराम गावडे (२८) ही मूळची बोटेझरी, ता. धानोरा येथील रहिवासी असून तिच्यावर खून, चकमक, शस्त्र व स्फोटक कायद्यासह ९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. 

उत्तर गडचिरोलीत चळवळ खिळखिळी

काही दिवसांपूर्वीच टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून कमांडर भास्कर चकमकीत मारल्या गेला होता. त्यानंतर या भागाची जबाबदारी राजा ऊर्फ रामसाई मडावी याच्याकडे आली होती. आता तोसुद्धा मारल्या गेल्यामुळे उत्तर गडचिरोली भागातून नक्षल चळवळ खिळखिळी झाली असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

Web Title: A woman Naxalite along with a platoon commander was killed in an encounter in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.