प्रसूत महिलेला सोडले अर्ध्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:36+5:30

रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली.

The woman left the woman in half | प्रसूत महिलेला सोडले अर्ध्यातच

प्रसूत महिलेला सोडले अर्ध्यातच

Next
ठळक मुद्देएटापल्लीवासीयांनी केली मदत : प्रवासामुळे माता व बालकाची प्रकृती खालावली

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथील रूग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या गावापर्यंत न सोडता आष्टी येथे अर्ध्यावरच रूग्णवाहिकेने सोडले. बसची वाट पाहून थकलेल्या नवजात बालक व मातेची प्रकृती बिघडली.
एटापल्ली तालुक्यातील जांभिया येथील रेश्मा अक्षय गावडे (२१) हिला प्रसुतीकरिता १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गट्टा पीएचसीमध्ये दाखल केले. त्यानंतर तिला रूग्णवाहिकेने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. तिची प्रसुती गुंतागुंती असल्याचे लक्षात आल्यानंतर १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजता सदर महिलेला चंद्रपूर येथील रूग्णालयात रूग्णवाहिकेने रेफर केले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी गावाजवळ कळा येऊ लागल्याने तिला गोंडपिंपरी येथील रूग्णालयात भरती करण्यात आले. पहाटे ३ वाजता रेश्माची नार्मल प्रसुती झाली. २१ ऑगस्ट रोजी तिला सुट्टी देण्यात आली. रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली. जांभियाला जाण्याकरिता ती बसस्थानक परिसरात थांबली होती. तेवढ्या रात्री जांभियासाठी जाणारे बस किंवा खासगी वाहन मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवजात बाळाला घेऊन थांबावे कुठे, या चिंतेतही होती. ही बाब एटापल्ली येथील नागरिकांच्या लक्षात आली. तिला ग्रामीण रूग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी माता व बाळावर उपचार केले. गुरूवारी दुपारी १२ वाजता सदर मातेला रूग्णवाहिकेने घरी सोडण्यात आले.

जबाबदार कोण?
गोंडपिंपरी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना विचारणा केली असता, दुसऱ्या जिल्ह्यातील प्रसूत मातेला रूग्णवाहिकेने घरापर्यंत सोडता येत नाही. त्यामुळे तिला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात सोडण्याच्या सूचना रूग्णवाहिका चालकाला दिल्या होत्या, असे सांगितले. चालकाला विचारणा केली असता, आपण सदर महिलेला आष्टी रूग्णालयात सोडण्यास तयार होतो. मात्र नातेवाईकांनी आग्रह केल्याने त्यांना आष्टी बसस्थानकावर सोडलो. नातेवाईकांना विचारणा केली असता, चालकानेच आपल्याला बसस्थानकावर उतरविले, अशी माहिती दिली. त्यामुळे यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The woman left the woman in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.