महिला मजुरांची पोरं उन्हात
By Admin | Updated: February 26, 2015 01:38 IST2015-02-26T01:38:24+5:302015-02-26T01:38:24+5:30
जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत २५ फेब्रुवारीपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कामावर येणाऱ्या महिला मजुरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी ...

महिला मजुरांची पोरं उन्हात
भीमराव मेश्राम जोगीसाखरा
जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत २५ फेब्रुवारीपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कामावर येणाऱ्या महिला मजुरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी स्वतंत्र महिला ठेवण्यास यंत्रणेने नकार दिल्यामुळे लहान मुले उन्हातच दिवसभर राहत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत मागील चार महिन्यांपासून मजुरांना रिकामे राहावे लागत होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने २५ फेब्रुवारीला एकाएकी तीन काम रोजगार हमी योजनेतून सुरू केली. या कामावर सरासरी ४०० मजुरांना काम देण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना सांभाळण्यासाठी महिलेची तसेच लहान मुलांना पाळण्यात हलविण्यासाठी कुठलीही यंत्रणा उभी केलेली नाही. त्यामुळे या कामावर काम करणाऱ्या महिलांची लहान मुले दिवसभर उन्हात राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. या कामावर अत्यंत गरीब कुटुंबातील लोक साधारणत: येतात. रोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांच्या लहान मुलांच्या देखभालीसाठी स्वतंत्र पाळणाघर निर्माण करण्याची तरतूद या योजनेंतर्गत आहे. तसेच मजुरांच्या पाच वर्षाखालील मुलांना स्तनपान, आहार याची काळजी घेण्यातही कोणतीही कसूर होऊ नये, यासाठी शासनाने फिरते पाळणाघरही निर्माण केले आहेत.
आरमोरी तहसील कार्यालयात अशा पाळणाघराची वाहने पडून आहेत. मात्र जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या या कामावर मजुरांची लहान मुले उन्हात फिरताना दिसून आली. त्यामुळे या गंभीर प्रकाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.